संततधारेमुळे दारणा, भावली, काश्यपी, गौतमीच्या पाणीसाठ्यात वाढ
By Admin | Updated: July 25, 2014 00:37 IST2014-07-24T22:29:22+5:302014-07-25T00:37:24+5:30
बळीराजा सुखावला : जिल्ह्याच्या पश्चिमपट्ट्यात पावसाचा जोर

संततधारेमुळे दारणा, भावली, काश्यपी, गौतमीच्या पाणीसाठ्यात वाढ
नाशिक : गेल्या तीन-चार दिवसांपासून संततधार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १८४८ दलघफू (३२ टक्के) पाणीसाठा आहे, तर भावलीचा पाणीसाठा २८ वरून ५८३ दलघफू (४० टक्के) इतका झाला आहे.
पश्चिमपट्ट्यात पावसाचा जोर कायम असून, त्यामुळे नदी-नाले भरून वाहू लागले आहेत. गंगापूर धरणाला पाणीपुरवठा करणारी किकवी नदी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे शून्य टक्के असलेला काश्यपी धरणाचा पाणीसाठा २२ दलघफू झाला आहे. त्याचप्रमाणे अवघ्या ३५० दलघफूवर आलेला दारणा धरणाचा पाणीसाठा २८०३ (३९ टक्के) इतका झाला आहे. शून्य टक्के असलेला गौतमी गोदावरी मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा १७० दलघफू झाला आहे. वालदेवीही कोरडेठाक पडलेले असताना, आता संततधारेमुळे वालदेवी धरणात ९३ दलघफू पाणीसाठा झाला आहे. शून्यावरच गेलेले मुकणे धरणही आता हळूहळू भरू लागले असून, २३ जुलैअखेर मुकणे धरणात २६७ दलघफू पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याच्या पूर्वभागातही काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग येण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)