माळमाथा परिसरात दिवाळीची लगबग सुरू
By Admin | Updated: October 23, 2016 23:23 IST2016-10-23T23:23:13+5:302016-10-23T23:23:45+5:30
मालेगाव : झोडगे बाजारपेठेत ग्रामीण भागातील ग्रामस्थांची खरेदीसाठी गर्दी

माळमाथा परिसरात दिवाळीची लगबग सुरू
मालेगाव : शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये दिवाळीची खरेदी सुरू झाली आहे. वसुबारस तथा गोवस्त पूजनाने दिवाळीच्या सणाला प्रारंभ होतो. या दिवसापासून सहा दिवस सुरू होणाऱ्या दिवाळी सणासाठी बाजारात विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.
कौळाणे (गा.)सह माळमाथा परिसरात दीपावलीच्या खरेदीसाठी परिसरातील ग्रामस्थ झोडगे येथील बाजारात खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत. माळमाथा परिसरात यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक होते. परंतु परिसराचे आर्थिक गणित कांदा पिकावर असल्याने उन्हाळी कांद्याला तसेच पावसाळी कांद्यांना भाव नसल्याने शेतकरी वर्गाकडून खरेदीसाठी कमी प्रतिसाद दिसून येत आहे.
दिवाळीत नवीन कपड्यांची खरेदी केली जाते. बाजारात नवीन पद्धतीच्या फॅशनचे कपडे दाखल झाले आहेत. याशिवाय नवीन आलेल्या सिनेमांच्या नावाचे पॅटर्नचे (मस्तानी, पटियाला, घागरा, सांवरिया) विविध प्रकारचे कपडे बाजारात दाखल झाले आहेत.
बाजारपेठेत दीपावलीच्या सणाच्या फराळाकरिता किराणा दुकानात गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच मिठाई दुकानेदेखील सज्ज झाली आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांची सजावट केलेली दिसून येत आहे. फराळासाठी असणारे पदार्थ चकली, करंजी, शंकरपाळे, अनारसे, मिक्स फरसाण इत्यादि पदार्थांची आकर्षक पॅकिंग करुन दुकानदार सज्ज झाले आहेत. बाजारपेठेत विविध प्रकारचे आकाशकंदील येणाऱ्या-जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहेत. मराठा क्रांती मोर्चाचादेखील आकाशकंदील बाजारात दाखल झाले आहेत. दिवाळी सणाला शिरई(लक्ष्मी)चे पूजन केले जाते. त्यामुळे या काळात नवीन शिरई व विविध रंगांच्या रांगोळ्या खरेदी करताना महिलांची गर्दी दिसून येतो आहे. अद्याप बऱ्याच शाळांना सुट्ट्या लागल्या नाहीत. सुट्या लागल्यानंतर गर्दी वाढेल, असे व्यापारी वर्गाने सांगितले. (वार्ताहर)