सिंहस्थात काम करणाऱ्या मजुरांची दिवाळी अंधारात
By Admin | Updated: November 10, 2015 23:50 IST2015-11-10T23:49:58+5:302015-11-10T23:50:49+5:30
त्र्यंबकेश्वर : देयकांसाठी ठेकेदाराचा प्रशासनाकडे तगादा

सिंहस्थात काम करणाऱ्या मजुरांची दिवाळी अंधारात
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ यशस्वी करण्यात खऱ्या अर्थाने सहभाग असलेल्या ठेकेदारांची दिवाळी अखेर अंधारातच राहिली. त्यामुळे मजुरांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे. सिंहस्थ आटोपल्यानंतर दीड महिन्यापासून प्रशासनाचा नखरा आणि ठेकेदारांच्या बिलासाठी चकरा सुरू आहेत.
सिंहस्थ नियोजन यशस्वी झाले म्हणून प्रशासनाची वाहवा झाली. येथील मूलभूत सुविधांची विकासकामे चांगली झाली त्याचे साधू-महंतांनी वारंवार गौरवोद्गार काढले. सिंहस्थ यशस्वी झाला म्हणून अद्याप सत्कारसत्र सुरू आहे. विकासकामांच्या माध्यमातून चमकणाऱ्या प्रशासनास याबाबतचे आपण काही देणे लागतो याचा सोयीस्कर विसर पडलेला दिसतो. साधारण वर्षभरापूर्वी कुणी निविदा घेण्यास तयार नाही अशी स्थिती उद्भवली असता उबंरठ्यावर आलेला सिंहस्थ कसा संपन्न होणार, याची काळजी प्रशासन आणि त्यांचे अधिकारी यांना सतावत होती. त्यानंतर कामे सुरू झाली तेव्हा युद्धपातळीवर करा म्हणून ठेकेदारांना तगादे लागले होते. कोट्यवधी भाविक आणि लाखभर साधू येणार अशी आकडेवारी सादर करत आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्याचा बडगा दाखवण्यात येत होता. मेअखेर आणि जूनमध्ये पिण्यास पाणी मिळणे मुश्कील झाले असताना, टँकरने पाणी विकत घेऊन कामे पूर्णत्वास नेण्यात आली. साधारणत: जूनअखेर बहुतांश कामे पूर्ण होत आली होती. त्यानंतर किरकोळ स्वरूपातील अशी मिळून सर्व कामे १४ जुलै २०१५ रोजी ध्वजपर्वापूर्वी पूर्ण झाली. युद्धपातळीवर कामे पूर्ण झाल्यानंतर साधारणत: चार महिने उलटले तरी कागदपत्रे पूर्ण नाहीत. सिंहस्थ कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच यंत्रणा राबविण्यात आल्या. नगरपालिका, सिंहस्थ शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि मेरी यांचे अभियंते डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होते. त्याचबरोबर नियुक्त केलेली खासगी वास्तुविशारद संस्था होती. एकूणच इतके सर्व असताना काही कामांचे नकारात्मक अहवाल आले म्हणून सर्वांचीच देयके रखडवण्यात आल्याने प्रशासनाने केलेले दुर्लक्ष यातून स्पष्टपणे जाणवत आहे.
त्र्यंबक नगरपालिकाअंतर्गत
सुमारे ५५ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशी सुरुवातीची काही रक्कम अदा झाली आहे. जवळपास २५ पेक्षा अधिक ठेकेदार यामध्ये अडकले आहेत. पर्यायाने त्यांच्याकडील मजूर, बांधकाम साहित्य पुरवठादार, वाहनचालक आदि सर्व हवालदिल झाले आहेत. (वार्ताहर)