१५ आॅगस्टला होणार महावितरणचे विभाजन

By Admin | Updated: July 30, 2016 01:26 IST2016-07-30T01:24:26+5:302016-07-30T01:26:52+5:30

१५ आॅगस्टला होणार महावितरणचे विभाजन

The division of Mahavitaran will be done on August 15 | १५ आॅगस्टला होणार महावितरणचे विभाजन

१५ आॅगस्टला होणार महावितरणचे विभाजन

नाशिक : महावितरणच्या १६ परिमंडळांचे विभाजन करून चार प्रादेशिक विभाग कार्यान्वित करण्याची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाली असून, येत्या १५ आॅगस्ट रोजी राज्यात चार प्रादेशिक कार्यालये अस्तित्वात येणार असल्याची घोषणा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे केली आहे. महावितरणच्या विभाजनाला सर्वच कर्मचारी संघटनांकडून विरोध दर्शविण्यात आल्यानंतही मंत्रिमहोदयांनी थेट तारखेचीच घोषणा केल्यामुळे आता कामगार संघटना काय भूमिका असेल यावर महावितरणचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
मागीलवर्षी डिसेंबरमध्ये उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणचे विभाजन करण्याची घोषणा केल्यानंतर मागासवर्गीय कामगार संघटनांनी त्यास तीव्र विरोध करीत राज्यभर आंदोलने केली होती. त्यावेळी कामगार संघटनांशी झालेल्या चर्चेनंतर प्रादेशिक विभागाबाबत सर्वसंमतीनेच निर्णय घेतला जाईल असे सांगून तूर्तास हा विषय बाजूला ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले होते.
शिवाय कामगार संघटनांकडून होणारा विरोध कायम असल्याने प्रादेशिक कार्यालये अस्तित्वात येणार की नाही याविषयीची साशंकता होती. महावितरणचे चार कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यास भरती, पदोन्नती या घटनात्मक अधिकारावर परिणाम होण्याची भीती कामगार संघटनांनी व्यक्त केली होती.
विभाजन मागे न घेतल्यास राज्यातील संघटनांचे ६० हजार कर्मचारी संपावर जातील, असा इशाराही देण्यात आला होता.
आता मंत्र्यांनीच याप्रकरणी घोषणा केल्यामुळे महावितरणचे विभाजन होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
यावेळी त्यांनी केवळ घोषणा केली नाही, तर प्रादेशिक कार्यालयांमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रशासनिक सेवेतील किंवा बाहेरील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. नवीन रचनेनुसार महावितरणचे एक व्यवस्थापकीय संचालक आणि चार सहव्यवस्थापकीय संचालक असणार आहे. राज्यातील वीजवितरण प्रणाली सक्षम करण्यासाठी तसेच महावितरणवरील ताण कमी करण्यासाठी कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी प्रादेशिक कार्यालये अस्तित्वात येणार असल्याचे उर्जामंत्र्यांनी यापूर्वीच सांगितलेले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The division of Mahavitaran will be done on August 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.