भाजपा आमदारांचे प्रभाग हगणदारीमुक्त

By Admin | Updated: June 10, 2016 22:59 IST2016-06-10T22:58:03+5:302016-06-10T22:59:37+5:30

स्वच्छ भारत अभियान : शौचालय योजनेवर भाजपाचा प्रभाव

Division of BJP MLAs, Hail-free | भाजपा आमदारांचे प्रभाग हगणदारीमुक्त

भाजपा आमदारांचे प्रभाग हगणदारीमुक्त

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात वैयक्तिक व गट शौचालयांची योजना महापालिकेमार्फत युद्धपातळीवर राबविली जात असून, महापालिकेने शहरातील ६१ पैकी ७ प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे त्यात नगरसेवकपदही भूषविणारे भाजपाचे चार आमदार (एकमेव वळगता) तसेच काही सेना-भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या मनसेवर कुरघोडी करत शौचालय योजनेत भाजपाने प्रभाव दाखविल्याने सत्ताधाऱ्यांची दोलायमान स्थिती समोर आली आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात शौचालय उभारणीची योजना राबविली जात आहे. महापालिकेने सर्वेक्षण करून डिसेंबर २०१६ अखेर ७५२८ लाभार्थींना वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करून देण्याचा आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत २३३० वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम झाले असून, ८२२ शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. गट आणि सार्वजनिक शौचालयांचे काम मात्र जागेअभावी रखडले आहे. या योजनेसाठी महापालिकेला आतापर्यंत केंद्रसरकारकडून ५ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. दरम्यान, शहरात युद्धपातळीवर राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत आतापर्यंत सात प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेला आहे. त्यामध्ये सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १७, पंचवटीतील प्रभाग ११, नाशिकरोडमधील प्रभाग ३३ आणि ५६, सिडकोतील प्रभाग ४६ आणि ४७ आणि नाशिक पश्चिममधील प्रभाग क्रमांक १५चा समावेश आहे. प्रभाग ११ हा भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि ज्योती गांगुर्डे, प्रभाग १५ हा आमदार सीमा हिरे व आमदार डॉ. राहुल अहेर, प्रभाग ४६ हा भाजपा आमदार अपूर्व हिरे व सेनेच्या शोभा निकम, प्रभाग १७ हा भाजपा नगरसेवक दिनकर पाटील व त्यांच्या पत्नी लता पाटील, प्रभाग ५६ हा भाजपाचे संभाजी मोरुस्कर आणि सविता दलवाणी, प्रभाग ४७ हा सेनेचे सुधाकर आणि हर्षा बडगुजर यांचा असल्याने शौचालय योजनेवर पूर्णत: भाजपाचा प्रभाव दिसून येत आहे. प्रभाग ३३ हा मनसेचे अशोक सातभाई यांचा प्रभाग असून, सत्ताधाऱ्यांच्या नगरसेवकाचा हा एकमेव प्रभाग हगणदारीमुक्त होऊ शकला आहे. या सर्व प्रभागांमध्ये शौचालय योजना राबविण्यात येऊन काम पूर्ण झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. महापालिकेत सत्ता मनसेची असताना सदर योजना भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात प्रभावीरीत्या राबविली गेल्याने मनसेच्या नेतृत्वाविषयी शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Division of BJP MLAs, Hail-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.