प्रभाग १९ : पोटनिवडणूक
By Admin | Updated: June 1, 2014 01:25 IST2014-06-01T00:31:53+5:302014-06-01T01:25:28+5:30
भाजपा, शिवसेनाही रिंगणात

प्रभाग १९ : पोटनिवडणूक
भाजपा, शिवसेनाही रिंगणात
सातपूर : लोकसभा निवडणुकीतील मतदारांचा कौल पाहून प्रभाग क्रमांक १७ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेबरोबरच भाजपानेदेखील निवडणूक लढविण्याचा दावा केला आहे.
प्रभाग क्रमांक १७ मधील शिवाजीनगर, श्रमिकनगर, ध्रुवनगर आदि भागातून मागील महापालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर दिनकर पाटील आणि लता पाटील हे दाम्पत्य विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीत दिनकर पाटील यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन बसपाची उमेदवारी करीत निवडणूक लढविली होती. त्यामुळे या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत दिनकर पाटील पुन्हा निवडणूक लढविणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. मोदी लाटेत मातब्बर उमेदवार पराभूत झाले असल्याने आता भाजपाच्या इच्छुक उमेदवारांचा उत्साह वाढला आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील परिसरात भाजपाचे काहीही अस्तित्व नसताना आणि आतापर्यंत झालेल्या महापालिकेच्या पाच निवडणुकीत भाजपाने या भागातून उमेदवारदेखील उभा केलेला नसताना पोटनिवडणुकीत मात्र भाजपाकडून उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश पाहून या प्रभागातूनदेखील भाजपाला मतदान होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
शिवसेना या प्रभागातून उमेदवार उभा करणार असून, कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणणारच, अशी अपेक्षा माजी प्रभाग सभापती विलास शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या पोटनिवडणुकीत पुन्हा उमेदवारी करून पुढील अडीच वर्षांसाठी मीच नगरसेवक असणार आहे, असे दिनकर पाटील यांनी जाहीर केले आहे. मात्र बसपाची उमेदवारी करणार नाही. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर बसपा सोडून दिल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारी कोणत्या पक्षाकडून करणार हे पाटील यांनी स्पष्ट केलेले नाही.