जिल्ह्याचे ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडील पहिले पाऊल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST2021-05-30T04:12:56+5:302021-05-30T04:12:56+5:30
नाशिक : जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. २९) १० केएल क्षमतेच्या ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून ...

जिल्ह्याचे ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडील पहिले पाऊल !
नाशिक : जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. २९) १० केएल क्षमतेच्या ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याने ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे पाऊल टाकले असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून जिल्ह्यात ४० ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण करण्यात येणार आहेत. या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला ३७ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार असल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमुळे रुग्णालयाची ऑक्सिजन क्षमता १० केएलने वाढणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाची अंतर्गत ऑक्सिजनची क्षमता २० केएलची होती; पंरतु निर्माण करण्यात आलेल्या या नव्या प्लांटमुळे जिल्हा रुग्णालयाची क्षमता ३० केएल झाली आहे. निर्माण करण्यात आलेल्या या प्लांटमुळे नव्याने वाढविण्यात आलेल्या दीडशे बेडला पूरकव्यवस्था म्हणून या प्लांटचा उपयोग होणार आहे, असे या वेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. या वेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार उपस्थित होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाची दिवसाला २२५ जम्बो सिलिंडर भरण्याची क्षमता राहणार आहे. तसेच प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात निर्माण करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटची क्षमता दिवसाला १२५ सिलिंडरची राहणार असून, ग्रामीण रुग्णालयांमध्ये ६० ते ७० जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती दिवसाला होणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये उद्योग विभागाकडून ७० मेट्रिक टन ऑक्सिजननिर्मिती करणारा एक मोठा प्रकल्प प्रस्तावित आहे, असे भुजबळ यांनी नमूद केले. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होण्यासाठी शासकीय व महापलिका रुग्णालयांत ४० ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २४, केंद्र सरकारच्यावतीने ०४, एचएएल व इंडिया सिक्युरिटी प्रेस सीएसआर फंडातून ०४ प्लांट, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून ०६ तर, मालेगाव महानगरपालिकेमध्ये एसडीआरएफ निधीतून २ असे एकूण ४० ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती केली जाणार आहे. हे सर्व ऑक्सिजन जनरेशन प्लांट जूनअखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहेत.
इन्फो
या ठिकाणी होणार ऑक्सिजन जनरेशन प्लांट
जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येवला, मनमाड, कळवण, चांदवड ,ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव बसवंत, इगतपुरी, सिन्नर, अभोणा, वणी, दिंडोरी, बाऱ्हे, घोटी, गिरणारे, हरसूल, निफाड, नगरसूल, लासलगाव, देवळा, उमराणे, सटाणा, नामपूर, मालेगाव सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालय या २४ ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार आहेत. केंद्र सरकारच्या निधीतून नांदगाव, दाभाडी, पेठ सुरगाणा या ४ ठिकाणी तर, प्रेसच्या सीएसआर फंडातून दोडी व त्र्यंबकेश्वर, गिरणारे, डांगसौंदाण येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार असल्याचे या वेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.