जिल्हा सुरक्षारक्षकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा
By Admin | Updated: January 18, 2016 22:56 IST2016-01-18T22:53:58+5:302016-01-18T22:56:28+5:30
मागणी : म्हाडाच्या अधिकाऱ्यांना निवेदन

जिल्हा सुरक्षारक्षकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा
नाशिक : जिल्हा सुरक्षारक्षक मंडळात सुमारे १५०० सुरक्षारक्षक कार्यरत असून, तुटपुंज्या पगारावर घर घेणे शक्य नसल्याने त्यांना म्हाडाच्या घरकुल योजनेतून घरे देण्यात यावीत, अशी मागणी भारतीय सुरक्षारक्षक कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सरिता नरके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा सुरक्षा मंडळात १५०० ते १७०० सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. त्यांना दर महिन्याला ७ ते ८ हजार वेतन मिळते. एवढ्या कमी वेतनात स्वत:चे घर घेणे शक्य नसल्याने त्यांना म्हाडाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन घरकुल योजनेतून हक्काचे घर मिळवून द्यावे, अशी मागणी भारतीय सुरक्षारक्षक कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सचिन राऊत, सोपान उकोड, दीपक शिरसाठ, सचिन राजभोज, सतीश जाधव, माधव भामरे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.