जिल्ह्यात गत वर्षाच्या तुलनेत चौपट पाऊस
By Admin | Updated: July 1, 2017 23:43 IST2017-07-01T23:36:56+5:302017-07-01T23:43:54+5:30
वार्षिक २४ टक्के : जुलैच्या पहिल्याच दिवशी आगमन

जिल्ह्यात गत वर्षाच्या तुलनेत चौपट पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावलेल्या मान्सूनपूर्व पावसाने नंतरच्या काळात मृग व आर्द्रा नक्षत्रात आपला मुक्काम कायम ठेवल्यामुळे जून महिन्याच्या सरासरीपेक्षा १२० टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच जून महिन्यात कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या २४ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून, जुलैच्या पहिल्या दिवशीही जोरदार हजेरी लावली आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात ९४८ मिलिमीटर म्हणजेच जूनच्या सरासरीच्या फक्त ६३ टक्के पाऊस पडला होता. यंदाच्या पावसाशी त्याची तुलना केल्यास चारपट पाऊस जिल्ह्णात नोंदविला गेला आहे. त्यातही नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. जून महिन्यातील पावसाची एकूण टक्केवारी पाहता ती जिल्ह्णाच्या वार्षिक पावसाच्या २४ टक्के इतकी असून, गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच इतका पाऊस झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
गेल्या चोवीस तासांत म्हणजेच शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्णात २१४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत पहिल्याच दिवशी १४ टक्के पाऊस पडला आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच नाशिक शहर, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, सिन्नर या तालुक्यांमध्ये पावसाने जोर धरला. नाशिक शहरात शनिवारी सकाळी आठ ते दहा या दोन तासांच्या काळात पावसाने झोडपून काढले. सकाळची वेळ असल्याने नोकरदारांची तसेच कामगार वर्गाची धावपळ उडाली. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रकारही घडले. दिवसभरात १४६ मिलिमीटरची नोंद शुक्रवारी अपवाद वगळता आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्णात सर्वदूर हजेरी लावली. त्यात नाशिक- ३०, इगतपुरी- २०, त्र्यंबकेश्वर- ६२, दिंडोरी- ५, पेठ- १७, निफाड- ३, देवळा- २, मालेगाव- १, सुरगाणा- ५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गंगापूर धरणक्षेत्रात ११३ मिलिमीटर पाऊसशुक्रवारी सकाळी आठ ते दहा या दोन तासांच्या कालावधीत गंगापूर धरणक्षेत्रात ११३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, त्र्यंबकेश्वर व आंबोली भागात ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने त्याचा फायदा गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात झाला आहे. गंगापूर धरणात सध्या २६ टक्के पाणी साठा असून, शुक्रवारच्या पावसामुळे सुमारे ३५० दशलक्ष घनफूट वाढ झाल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. इगतपुरी भागात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरणातही एका दिवसात ४५० दशलक्ष घनफूट पाणी साठले आहे.