जिल्ह्यात संततधार कायम
By Admin | Updated: July 5, 2016 00:29 IST2016-07-04T23:19:47+5:302016-07-05T00:29:31+5:30
बळीराजा सुखावला : पेरण्यांना येणार वेग

जिल्ह्यात संततधार कायम
नाशिक : रविवारी मुसळधार झालेल्या पावसाने सोमवारीही (दि.४) दिवसभर संततधार कायम ठेवल्याने बळीराजा सुखावला आहे. संततधारेमुळे खरिपाच्या खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग येण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांच्या भीज पावसाने जमिनीत ओल उतरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शनिवारी मध्यरात्रीपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर शहरासह जिल्ह्यात हजेरी कायम ठेवल्याने काही प्रमाणात बळीराजाला दिलासा मिळाला आहे. जून कोरडा गेल्याने खरिपाच्या सुमारे साडेसहा लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्याचे चित्र होते. मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावण्यास प्रारंभ केला. आद्राच्या शेवटच्या चरणात सुरू झालेला पाऊस संपूर्ण आद्रा संपेपर्यंत कायम राहिला आहे. आता पुनर्वसू आणि आश्लेषा नक्षत्रावर पावसाची कशी हजेरी राहते, यावरच खरिपाच्या पेरण्यांचे भवितव्य अवलंबून राहील. तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावणाऱ्या जिल्ह्णातील धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यात अल्प प्रमाणात, तर इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवारी पावसाचा जोर कायम राहिला.