जिल्हा बॅँक अध्यक्षांवर अविश्वास?
By Admin | Updated: September 10, 2016 01:38 IST2016-09-10T01:35:49+5:302016-09-10T01:38:19+5:30
तातडीच्या बैठकीत इशारा : राजीनामा देण्याची सूचना

जिल्हा बॅँक अध्यक्षांवर अविश्वास?
गणेश धुरी नाशिक
गेल्या वर्षी जून महिन्यात अध्यक्ष-उपाध्यक्षांची वर्षभरासाठी झालेली निवड आणि त्याअनुषंगाने राजीनामा देण्यास ‘राजी’ नसलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यावर अविश्वास आणण्याचा बहुमुखी निर्णय शुक्रवारी (दि. ९) रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
एकोप्याने दोेन्ही गटाचा अध्यक्ष केले असून, समजुतदारीने राजीनामा द्या, असा सल्ला ज्येष्ठ संचालकांनी दिला, तर राजीनामा न दिल्यास अविश्वासाला सामोरे जाण्याचा इच्छुक संचालकांनी दिलेला इशाराच बैठकीचा नूर पालटून गेला.
शहराच्या मध्यवर्ती चांडक सर्कल लगत असलेल्या एका तारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची अनौपचारिक बैठक बोलविण्यात आली होती. बैठक बोलविण्यामागे जिल्हा बॅँकेचेच एक ज्येष्ठ व माजी आमदार असलेल्या एका संचालकाची महत्त्वाची भूमिका होती; मात्र ऐनवेळी या माजी आमदाराच्या घरातील नातलग अचानक आजारी पडल्याने या संचालकाला मुंबईला घाईगर्दीत जावे लागले. जिल्हा बॅँकेच्या या अनौपचारिक बैठकीस २१ पैकी १७ संचालक जातीने हजर होते. विद्यमान आमदार असलेल्या एका तातडीने सर्व संचालकांना जिल्हा बॅँकेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचा सांगावा धाडला. पाठोपाठ बहुसंख्य संचालक या चांडक सर्कल परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये जमा झाले. वर्षभरासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक असल्याने तुमचा कार्यकाळ झाला आहे, तुम्ही राजीनामा द्या, असे एका इच्छुक संचालकाने सांगितल्यावर ‘बघू, काही तरी निर्णय घेऊ, करतो, सांगतो,’ असे थातुरमातुर उत्तर आल्याने मग एका आमदार संचालकाने आम्हाला अविश्वास ठराव आणण्यास मजबूर करू नका, असा निर्वाणीचा इशारा दिल्याने बैठकीचे वातावरण तापले. अखेर माजी आमदार असलेल्या एका ज्येष्ठ संचालकाने ‘आपण इतके दिवस एकोप्याने कामकाज केले, त्यामुळे अविश्वास नको, सामोपचाराने खांदेपालट करा’ असा सल्ला दिल्याचे समजते. या बैठकीस एका माजी आमदारासह एक माजी अध्यक्ष व दोघे पहिल्यांदाच निवडून आलेले संचालक वगळता १७ संचालक उपस्थित होते.