आर्मस्ट्राँगला दिलेल्या कर्जामुळे जिल्हा बॅँकेची वाढली डोकेदुखी
By Admin | Updated: August 26, 2016 00:40 IST2016-08-26T00:37:26+5:302016-08-26T00:40:29+5:30
एनपीए वाढणार : १५ कोटींचे कर्ज अडचणीत?

आर्मस्ट्राँगला दिलेल्या कर्जामुळे जिल्हा बॅँकेची वाढली डोकेदुखी
नाशिक : बेकायदेशीर मालमत्ता जमविल्याप्रकरणी ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत एकीकडे वाढ होत असतानाच त्यांच्या आर्मस्ट्रॉँग कंपनीला दिलेले कर्ज थकल्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकही अडचणीत सापडल्याचे वृत्त आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कारखान्याला दिलेल्या या कर्जाचे हप्ते थकल्याची कबुली जिल्हा बॅँकेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेला आता निफाड सहकारी कारखाना व नाशिक सहकारी कारखान्याप्रमाणेच आर्मस्ट्राँग साखर कारखान्यासाठी दिलेल्या कर्जापोटी त्यांच्या वार्षिक अंदाजपत्रकात एनपीएची तरतूद करण्याची वेळ येणार असल्याचे कळते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मालेगाव येथील आर्मस्ट्राँग साखर कारखान्याला सन २०१४-१५ मध्ये कर्ज दिले होते. त्यात वेळोवेळी आर्मस्ट्राँगने रक्कम वाढवून घेतली. त्यामुळे कर्जाची एकूण रक्कम सुमारे १२ कोटींच्या घरात गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. आर्मस्ट्राँग साखर कारखान्याला दिलेल्या कर्जापोटी त्याचे व्याज तीन कोटींच्या घरात गेले आहे.
त्यामुळे जिल्हा बॅँकेला १५ कोटींची थकबाकी आर्मस्ट्राँगकडून घेणे आहे. या बदल्यात आर्मस्ट्राँग कारखान्याने ३९ एकर जमीन जिल्हा बॅँकेकडे तारण ठेवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या कर्जाचे हप्ते थकल्याचे जिल्हा बॅँकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)