जिल्हा बॅँकांच्या नाड्या आवळल्या, कोट्यवधींच्या ठेवी वळाल्या?
By Admin | Updated: November 16, 2016 00:28 IST2016-11-16T00:32:03+5:302016-11-16T00:28:35+5:30
जिल्हा बॅँकांच्या नाड्या आवळल्या, कोट्यवधींच्या ठेवी वळाल्या?

जिल्हा बॅँकांच्या नाड्या आवळल्या, कोट्यवधींच्या ठेवी वळाल्या?
नाशिक : देशभरातील कोणत्याही जिल्हा बॅँकांना पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्यास बंदी केल्यामुळे जिल्हा बॅँकांमध्ये जमा होणाऱ्या कोट्यवधींच्या ठेवी राष्ट्रीयीकृत व अन्य नागरी बॅँकांमध्ये वळाल्याची ओरड आता जिल्हा बॅँकांकडून करण्यात येत आहे. या निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्हा बॅँक उच्च न्यायालयात गेल्याची माहिती नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा बॅँकेप्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकही न्यायालयात जाण्याच्या तयारीत असून, याबाबत बुधवारी (दि. १६) संचालक मंडळ व प्रशासनाच्या तातडीच्या अनौपचारिक बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मंगळवारी (दि. १५) यासंदर्भात जिल्हा बॅँकेचा काही अधिकारीवर्ग मुंबईला तातडीने गेल्याची चर्चा होती; मात्र हा मुंबई दौरा खासगी स्वरूपाचा असल्याचे समजते. बुधवारी जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या उपस्थितीत नोटा न स्वीकारणाच्या रिझर्व्ह बॅँकेच्या निर्णयाबाबत चर्चा होणार असल्याचे कळते. चलनातून ५०० आणि १००० नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बॅँकांच्या शेकडो सभासदांनी नोटा भरण्यासाठी बॅँकांमध्ये गर्दी केली होती. नाशिक जिल्हा बॅँकेतही तीन दिवसात तब्बल २७० कोटींचा निधी बचत खात्यात जमा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. तसेच पीक कर्जापोटी ४ ते ५ कोटींचा भरणाही या जुन्या नोटांचा रूपाने झाल्याचे समजते. सोमवारी (दि. १४) रात्री रिझर्व्ह बॅँकेने देशभरातील सर्व जिल्हा बॅँकांना ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अन्य बॅँकांमध्ये वळाल्याचा आरोप जिल्हा बॅँकेच्या सूत्रांनी केला आहे.