जिल्हा बॅँक : संचालकांमध्ये नाराजी
By Admin | Updated: January 9, 2016 00:20 IST2016-01-09T00:04:15+5:302016-01-09T00:20:32+5:30
सुरक्षेपेक्षा तिजोरीची किंमत ‘जड’; अवाच्या सवा दराने खरेदी?

जिल्हा बॅँक : संचालकांमध्ये नाराजी
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निम्म्याहून अधिक संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार असतानाच सीसीटीव्हीच्या वादग्रस्त खरेदीनंतर आता तिजोरी खरेदीही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
काही दिवसांपूर्वीच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सुरक्षेचा मुद्दा म्हणून सीसीटीव्हीसह तिजोरी खरेदी करण्यावर संचालकांचे एकमत झाले होते. याला काही संचालकांनी लेखी विरोधही नोेंदविला.
सीसीटीव्ही खरेदीच्या वादग्रस्त प्रकरणानंतर काही दिवस उलटत नाही तोच आता जिल्हा बॅँकेच्या व्यवस्थापनाने अवाचे सवा दराने लोखंडी तिजोरी खरेदी करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी एका नामांकित कंपनीला थेट कंत्राट देण्याचा अजब ठरावच कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत झाल्याचे समजते. मुळातच अशा अमुक एका कंपनीच्या नावे ठराव तरी करता येतोे काय? असा प्रश्न काही संचालकांनी आता उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय ज्या कंपनीच्या नावे तिजोरी खरेदीचा ठराव केला आहे, त्याच कंपनीच्या नाशिकस्थित एका शोरूममध्ये जिल्हा बॅँकेने खरेदी करण्याचा निर्णय घेतलेल्या अत्याधुनिक लोखंडी तिजोरीचे दर १ लाख ३४ हजार आणि १ लाख ७४ हजार असे कमाल असताना प्रत्यक्षात जिल्हा बॅँकेने तितक्याच वजनाच्या आणि उंचीच्या त्याच कंपनीच्या तिजोऱ्या चक्क सहा लाखांच्या आसपास खरेदी करण्याचा घाट घातल्याची चर्चा आहे. त्यातही या तिजोरी खरेदी करण्यासाठी संबंधित नामांकित कंपनीकडून कोणतीही बॅँक गॅँरंटी न घेताच पावणे दोन कोटींचा धनादेशही त्या कंपनीला एकही तिजोरीचा पुरवठा झालेला नसताना अदा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती काही संचालकांनीच उघड केली
आहे.
आता कंपनी एक, त्या कंपनीच्या तिजोरीची उंची आणि वजनही तितकेच मात्र त्याच कंपनीच्या तिजोरीच्या दरांमध्ये अशी तीन ते चार लाखांची प्रचंड मोठी तफावत असल्याने व प्रत्यक्षात जिल्हा बॅँकेने केलेल्या खरेदीचे दर जास्त असल्याने या तिजोरी खरेदीत जिल्हा बॅँकेच्या ‘तिजोरी’वर डल्ला मारण्याचे काम जिल्हा बॅँकेच्या काही संचालक मंडळ व प्रशासनातील मोठ्या माशांनी केल्याची चर्चा आता सुरू आहे. (प्रतिनिधी)