शिधापत्रिकांचे येत्या दोन दिवसांत वाटप
By Admin | Updated: November 15, 2014 00:52 IST2014-11-15T00:52:13+5:302014-11-15T00:52:54+5:30
शिधापत्रिकांचे येत्या दोन दिवसांत वाटप

शिधापत्रिकांचे येत्या दोन दिवसांत वाटप
नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या सुमारे अकराशे शिधापत्रिकांचे येत्या दोन दिवसांत वाटप करण्याबरोबरच नागरिकांची कागदपत्रे गहाळ करणाऱ्या सेतू ठेकेदारावर कारवाई व एजंटांची मध्यस्थी दूर करण्याचे आश्वासन धान्य वितरण अधिकाऱ्यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून धान्य वितरण कार्यालयात शिधापत्रिकेसाठी नागरिकांची ससेहोलपट होत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी, धान्य वितरण अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार व महा ई-सेवा केंद्र चालकांची संयुक्त बैठक घेऊन सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत चालणाऱ्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यात आॅगस्ट महिन्यापासून धान्य वितरण कार्यालयातील कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने जवळपास अकराशे नागरिकांचे शिधापत्रिकांचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती धान्य वितरण अधिकारी उजागरे यांनी दिली. त्यावर येत्या दोन दिवसांत निर्णय घेऊन शिधापत्रिका वाटप करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रे गहाळ होण्याच्या अनेक घटना घडत असल्याने त्यांच्या कामकाजाच्या अनियमिततेबाबत दोन लाख रुपये दंड करण्याचा प्रस्ताव प्रशासनाला सादर करण्यात आला असून, त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याबद्दल उजागरे यांनी हतबलता व्यक्त केली. यावेळी रेशन दुकानदारांनी आपल्या समस्या मांडल्या. कमिशन वाढवून मिळावे, वाहतूक खर्च वाढवून द्यावा, पोषण आहाराचे पैसे मिळावेत, सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळेल इतके नियतन मंजूर करावे अशा मागण्या केल्या. त्यावर शासनाकडून सध्या एपीएल म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी तीस टक्केच धान्याचा कोटा मंजूर केला जात असल्याने त्या प्रमाणात दुकानदारांना त्याचे वाटप केले जात असल्याची माहिती जिल्हा धान्य पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी दिली, तर यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन आमदार फरांदे यांनी दिले.
सेतू कार्यालय व पुरवठा कार्यालयाबाहेर नागरिकांना मार्गदर्शनार्थ फलक लावण्याच्या व कार्यालयाला दलालांपासून मुक्त करण्याच्या सूचना केल्या. येत्या आठ दिवसांत रेशनसंदर्भातील तक्रारींसाठी जनता दरबार घेऊन जाहीर सुनावणी करण्याचे फरांदे यांनी घोषित केले. (प्रतिनिधी)