उमेदवारांकडून कामे वाटप
By Admin | Updated: February 21, 2017 01:18 IST2017-02-21T01:18:37+5:302017-02-21T01:18:50+5:30
प्रतिनिधी नेमणूक : कार्यकर्त्यांकडे मतदारांच्या व्यवस्थेची जबाबदारी

उमेदवारांकडून कामे वाटप
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून मंगळवारच्या मतदानाची तयारी केली जात असून, मतदान केंद्रांवर मतदान प्रतिनिधी, बूथ प्रतिनिधींची नेमणूक करण्याबरोबरच मतदारांची ने-आण तसेच पडद्यामागची कामे करण्यासाठी कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यावरच सोमवारी भर देण्यात आला.
महापालिका निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासूनच निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत गुंतलेल्या उमेदवारांसाठी आता केवळ काही तासच हाती शिल्लक राहिले आहेत. गेल्या महिनाभरापासून उमेदवार पक्षाची उमेदवारी, नामांकन अर्ज, त्याची तयारी, प्रत्यक्ष नामांकन, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, मतदार यादीचा अभ्यास, प्रचाराचे नियोजन, मतदारांच्या गाठीभेटी आदि कामांमध्ये दंग होते. रविवारी सायंकाळी निवडणुकीचा जाहीर प्रचार संपुष्टात आल्यानंतर आता उमेदवारांना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीची तयारी महत्त्वाची असल्याने त्यादृष्टीने कामे केली जात आहे. सोमवारचा संपूर्ण दिवस मतदान प्रतिनिधी, बूथ प्रतिनिधींची नेमणूक करण्यासाठी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. ज्यांना मतदान प्रतिनिधी नेमण्यात येणार त्यांच्याकडून प्रभागातील मतदार यादीचा अभ्यास करवून घेण्याबरोबरच संशयास्पद मतदारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर बूथ प्रतिनिधींना संगणकावर मतदारांची नावे शोधणे, त्यासाठी लॅपटॉपची सोय, मतदान केंद्राबाहेर बूथची जागा निश्चित करणे, मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करणे या कामांचे नियोजन करण्यात आले. मंगळवारी सकाळी सात वाजेपासूनच समर्थक, कार्यकर्त्यांना सक्रिय राहण्याचे ठरविण्यात आले. मतदान केंद्रावर नेमण्यात येणाऱ्या प्रतिनिधींच्या चहा-पाण्याची सोय, सकाळच्या वेळेत मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढणे, मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनांच्या व्यवस्थेवर अंतिम हात फिरविण्यात आला. (प्रतिनिधी)