लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती कायम टिकवून ठेवण्याबरोबरच त्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने यंदाही इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येणार असून, त्यासाठी नाशिक विभागातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता सुमारे ९९ लाख ४२ हजार ७६२ पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याचे शाळाशाळांमधून वितरण करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा मूळ हेतू कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि त्याला केवळ पुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये. शाळेतील सर्व दखलपात्र मुलांची शंभर टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे असा आहे. सदरची पुस्तके इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असून, त्याचा लाभ शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुबार, जळगाव जिल्हा परिषद व महापालिका व्यवस्थांपनांतर्गत सर्व शासकीय शाळा, आदिवासी विकास विभाग शाळा, समाजकल्याण विभागात शाळेतील सुमारे ९९ लाख ४२ हजार ७६२ विद्यार्थ्यांना ही पुस्तके देण्यात येणार असून, ३१ मेअखेर ही पुस्तके छापून पाठ्यपुस्तक महामंडळाच्या कार्यालयापर्यंत पोहोचली आहेत. सदरची पुस्तके १३ ते ३१ मे या सतरा दिवसांच्या कालावधीत नाशिक विभागाला प्राप्त झाले असून, ते तालुकास्तरावरील पंचायत समितीपर्यंत पोहोचविण्यात आली आहेत.यंदा सर्व शासकीय शाळा १७ जून रोजी सुरू होणार असून, तत्पूर्वी पंचायत समितीमार्फत सर्व संबंधित शाळांतील मुख्याध्यापकांना कळविण्यात येणार आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा उघडण्यापूर्वी सर्वसाधारणपणे दोन दिवस आधी ही पुस्तके ताब्यात देण्यात येणार आहे. गावातील शाळा व्यवस्थापन समिती, पदाधिकारी, अधिकारी व पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वितरण करावयाचे आहे. शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळामध्ये शिकत असलेल्या इयता पहिली ते आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दुकानातून पुस्तके खरेदी करून नये, असे आवाहन भांडार प्रमुख लक्ष्मण डामसे, व्यवस्थापक वसंत पालवे, अधीक्षक आत्माराम पाटील यांनी केले आहे.