१७०० किलो अमोनियम बायकार्बोनेटचे वितरण
By Admin | Updated: September 15, 2016 00:51 IST2016-09-15T00:49:55+5:302016-09-15T00:51:50+5:30
७०० लोकांचा प्रतिसाद : आजही होणार वितरण

१७०० किलो अमोनियम बायकार्बोनेटचे वितरण
नाशिक : प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती विसर्जनामुळे नदीपात्रातील जलप्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेसह काही स्वयंसेवी संस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या अमोनियम बायकार्बोनेटच्या पावडरला दिवसभरात सुमारे ७०० लोकांनी प्रतिसाद दिला असून सुमारे १७०० किलो पावडर वितरित करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.१५) सकाळी ९ ते १२ या कालावधीत सहाही विभागीय कार्यालयात पावडरचे वितरण सुरू ठेवण्यात येणार आहे.
पीओपीच्या मूर्तींमुळे जलप्रदूषणात भर पडत असल्याने पुणे महापालिकेने मूर्तीच्या विघटनासाठी अमोनियम बायकार्बोनेट या पावडरचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्याचे ठरविले आहे. पुण्याच्याच धर्तीवर नाशकातही हा प्रयोग राबविण्याचे महापालिकेने ठरविले आणि त्यासाठी राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स यांच्याकडून तीन टन अमोनियम बायकार्बोनेटची पावडर मागविण्यात आली. महापालिकेने सदर पावडर आपल्या सहाही विभागीय कार्यालयात उपलब्ध करून दिली आणि त्यासाठी स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक करत त्यांच्याशी नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार, बुधवारी दिवसभरात नाशिक पश्चिम विभागात २५ लोकांनी ५० किलो, पूर्व विभागात २५ लोकांनी १०० किलो, पंचवटी विभागात ५० लोकांनी १३० किलो, सातपूर विभागात ४० लोकांनी ७५ किलो, सिडकोत ७० लोकांनी २५० किलो तर नाशिकरोड विभागात ३२ लोकांनी १०० किलो पावडर नेल्याची माहिती संबंधित स्वच्छता निरीक्षकांनी दिली. दिवसभरात महापालिकेकडून सुमारे २५० ते ३०० लोकांनी ७०० किलो पावडर नेली आहे. याशिवाय, शहरातील पालवी आणि रेनबो फाउण्डेशन या स्वयंसेवी संस्थांनीही एक हजार किलो अमोनियम बायकार्बोनेट मागविले होते. सदर संस्थांकडून दिवसभरात ४०० लोकांनी १००० किलो पावडर नेल्याचे सांगण्यात आले.