जागेच्या वादातून भारतनगरमध्ये दंगल
By Admin | Updated: January 4, 2016 00:20 IST2016-01-04T00:14:12+5:302016-01-04T00:20:54+5:30
दगडफेक : गोळीबार झाल्याचा नागरिकांचा आरोप; अनैतिक व्यवसायातील अकरा महिला पोलिसांच्या ताब्यात

जागेच्या वादातून भारतनगरमध्ये दंगल
नाशिक : जागेच्या वादातून भारतनगर शेजारील नंदिनीनगरमधील काही झोपड्या दहशत निर्माण करून जेसीबीच्या साहाय्याने पाडण्याच्या घटनेस दोन दिवस उलटत नाही तोच रविवारी (दि़३) दुपारी पुन्हा उर्वरित झोपड्या पाडण्यासाठी आलेले सुमारे दीडशे संशयित व झोपडपट्टीवासीय यांच्यामध्ये दंगल होऊन दगडफेकीची घटना घडली़ यामध्ये संशयितांनी धमकावण्यासाठी गोळीबार केल्याचा आरोप झोपडपट्टीवासीयांनी केला असून, पोलिसांनी मात्र इन्कार केला आहे़ दरम्यान, पोलिसांनी अनैतिक व्यवसायातील अकरा महिलांना ताब्यात घेतले आहे़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
३१ डिसेंबर व १ जानेवारीला दुपारच्या सुमारास नंदिनीनगरमधील सुमारे २० ते २५ घरे संशयित आकाश साबळे, फुल्याबाई ऊर्फ आक्का व त्यांच्या आठ ते दहा साथीदारांनी धमकावून, दहशतीने जेसीबीच्या साहाय्याने तोडल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात या संशयितांवर गुन्हाही दाखल आहे़ रविवारी(दि़३) सकाळी या झोपड्यांतील रहिवाशांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जाऊन तोडलेल्या ठिकाणी पुन्हा झोपड्या उभारण्याची परवानगी मागितली़
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांनी झोपडपट्टीवासीयांकडून जागेच्या कागदपत्रांशिवाय परवानगी देता येत नसल्याचे सांगितल्याने झोपडपट्टीधारक पुन्हा नंदिनीनगरमध्ये आले़ यानंतर दुपारच्या सुमारास संशयित आकाश साबळे, फुल्याबाई ऊर्फ आक्का हे सुमारे दीडशे संशयितांसह तिथे आले व त्यांनी उर्वरित झोपड्या खाली करण्यासाठी दमदाटी केली़ यामुळे संतप्त झोपडपट्टीवासीय व संशयितांमध्ये वाद होऊन दंगल झाली़ यामध्ये तुफान दगडफेकही होऊन काही तरुण व महिला जखमी झाल्या आहेत़
नंदिनीनगरमधील झोपडपट्टी-वासीयांनी केलेल्या दगडफेकीत शर्मा यांच्या ‘मरियम निवास’ या इमारतीच्या काचा फोडण्यात आल्या तर या ठिकाणाहून अनैतिक व्यवसाय करणाऱ्या अकरा महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ याबरोबरच थोड्या अंतरावरील अनैतिक व्यवसायाचे केंद्र असलेल्या एका घराच्या बाहेरील पत्रेही जमावाने तोडले़ गत चाळीस वर्षांपासून या ठिकाणी अनैतिक व्यवसाय सुरू असून याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार रहिवाशांनी पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांच्याकडे केली़