निकवेल : पंचायत समितीसह सर्व कार्यालयातही डास
By Admin | Updated: September 27, 2016 00:53 IST2016-09-27T00:52:35+5:302016-09-27T00:53:07+5:30
डासांमुळे आमदारांसह कर्मचारी हतबल

निकवेल : पंचायत समितीसह सर्व कार्यालयातही डास
निकवेल : बागलाण पंचायत समिती सभापती कार्यालयासह इतर प्रत्येक कार्यालयामध्ये डासांचे साम्राज्य वाढलेले आहे. प्रत्येक कर्मचारी कार्यालयातील खुर्चीवर बसला की डासांचा उद्रेकामुळे त्या कर्मचाऱ्याला हातपाय झटकावे लागतात. डासांचे साम्राज्य जास्त वाढल्याने बागलाण पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पंचायत समिती सभागृहात आमदार दीपिका चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पाणीपुरवठा आढावाबैठक होती. सदर बैठक संपल्यानंतर जेव्हा निघाल्या तेव्हा निकवेल येथील सरपंच रामचंद्र मोरेयांनी आमदार यांच्याकडे आमच्या गावाला ग्रामसेवक नाही तर ग्रामसेवक द्या, अशी मागणी केली. तेव्हा आमदार चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, बागलाण पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव यांच्यासह निकवेल गावचे शिष्टमंडळ हे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात गेले. आमदार चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण सह उपस्थितीत लोकप्रतिनिधी डासांच्या उपद्रवाला अक्षरश: वैतागले आणि अखेर चव्हाण यांनी वैतागून गटविकास अधिकारी कार्यालय सोडले.
गेल्या कित्येक महिन्यांपासून बागलाण पंचायत समिती कार्यालयामध्ये डासांचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित विभाग याकडे डोळेझाक करीत आहे. बागलाण पंचायत समिती परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बऱ्याच ठिकाणी पडकी जागा आहे. त्यामध्ये पाणी साचलेले आहे. त्यामध्ये डुकरे येऊन बसलेली असतात. तसेच या भागामधील बऱ्यापैकी शासकीय कार्यालय आहेत. तेथे आलेले सारेच पंचायत समितीच्या पडक्या जागेचा वापर प्रातर्विधीसाठी करतात. पंचायत समितीमध्ये शौचालय, मुतारी हे पूर्णपणे अस्वच्छ आहे. त्यामुळे सर्वत्र डास वाढत आहेत. पंचायत समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांचे साम्राज्य असल्याने बागलाण पंचायत समिती लोकप्रतिनिधींबरोबरच कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
संबंधित विभागाने तात्काळ दखल घेत बागलाण पंचायत समिती आवारातील स्वच्छता करून धुराळण यंत्राद्वारे फवारणी करावी,
अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर)