लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शासनाच्या वतीने कृषी अधिकारी, तसेच तलाठी यांनी पंचनामेही केले असून, संबंधित विमा कंपनीने अद्यापपर्यंत विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे. आत्तापर्यंत कृषी विभागाला तालुक्यातील ११ हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ७ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाल्याचे इगतपुरी तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी सांगितले.
इगतपुरी तालुक्यात मागील वर्षी झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी विमा मिळण्यासाठी अर्ज दाखल केले होते, परंतु विमा कंपनीने विमा देण्यास टाळाटाळ करत फक्त ७ हजारांचं शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ दिला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार काशीनाथ मेंगाळ विमा कंपनीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. पीकविमा मिळण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत तहसील कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग, तसेच साकूर फाटा, इगतपुरी आदी ठिकाणी आंदोलने केली असून, संबंधित विमा कंपनीने याकडे साफ दुर्लक्ष करीत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करत आडमुठेपणाचे धोरण अवलंबत आहे.
मागील वर्षी शासनाच्या वतीने कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत पंचनामे देखील केले होते, परंतु संबंधित विमा कंपनीने याकडे डोळेझाक करीत शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत विमा रक्कम जमा न केल्यामुळे तालुक्यात संताप व्यक्त होत असून, शेतकरी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. सदर कंपनीने उर्वरित शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ का दिला नाही, अशी विचारणा करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी उशिराने अर्ज दाखल केल्यामुळे सदर नुकसान झालेले पीक ग्राह्य धरता येणार नसल्यामुळे विमा रक्कम मिळणार नाही, असे विमा कंपनीने सांगितले असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार हेमंत गोडसे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक घेत, विमा कंपनीला खडे बोल सुनावत तातडीने विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, असे आदेश दिले होते.
कोट...
मागील वर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असून, कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत पंचनामेही केले होते. तालुक्यातील ११ हजार शेतकऱ्यांचे पीकविमा अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ७ हजार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला आहे. उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज उशिराने दाखल झाल्यामुळे, सदर पिकांना ग्राह्य धरता येणार नसल्याने विमा कंपनीने सदर रक्कम जमा करण्यास नकार दिला आहे.
- शीतलकुमार तंवर, कृषी अधिकारी, इगतपुरी.
छायाचित्र- २७ नांदूरवैद्य २ व ३
इगतपुरी तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भातपिकांचे झालेले नुकसान.
270821\27nsk_36_27082021_13.jpg~270821\27nsk_37_27082021_13.jpg
इगतपुरी तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचे झालेले नुकसान.~पिकांचे नुकसान