नाशिक : येवला, मनमाड शहरासह पाणीपुरवठा योजनांना पालखेड धरणातून रविवारी सायंकाळी पाणी सोडण्यात येणार असून, साधारणत: दहा दिवस डाव्या कालव्याच्या मार्गे झेपावणाऱ्या या पाण्याची चोरी होऊ नये म्हणून कालव्याच्या दुतर्फा गावातील वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच, कालव्यात चोरून डोंगळे टाकण्यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. पालखेड धरणातून शेवटचे ७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय दहा दिवसांपूर्वीच घेण्यात येऊन २५ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते, त्यासाठी कालव्यात टाकण्यात आलेले डोंगळे जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुमारे दीड हजारांच्या आसपास डोंगळे काढण्यात आल्यानंतर रविवारी सायंकाळी पालखेडमधून पाणी सोडण्यास पाटबंधारे खाते राजी झाले आहे. त्यासाठी तयारी करण्यात आली असून, कालव्याच्या दुतर्फा असलेल्या सुमारे २५ गावांमध्ये या काळात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. धरणातून सोडलेले पाणी इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी साधारणत: ६० तासांचा कालावधी लागणार असून, साधारणत: दहा दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
कालवा परिसरातील २५ गावांची वीज खंडित
By admin | Updated: April 30, 2017 01:41 IST