अभोण्यात खंडित वीजपुरवठा
By Admin | Updated: March 2, 2017 00:50 IST2017-03-02T00:50:06+5:302017-03-02T00:50:16+5:30
अभोणा : वीज वितरण कंपनीच्या अभोणा उपविभागातील क्षेत्रातील गावांच्या शिवारातील विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती निर्माण झाली आहे

अभोण्यात खंडित वीजपुरवठा
अभोणा : वीज वितरण कंपनीच्या अभोणा उपविभागातील कनाशी फीडर क्षेत्रातील गोसराणे, बार्डे, जयपूर, बेलबारे, साबळेपाडा आदि गावांच्या शिवारातील विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती निर्माण
झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
दोन महिन्यांपासून कनाशी फीडर क्षेत्रात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतातील पिकांना पाणी भरणे गरजेचे आहे. मात्र, किमान पाच मिनिटेही वीज टिकत नसल्याने गोसराणे, जयपूर, बार्डे, बेलबारे, साबळेपाडा आदि गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अस्मानी-सुलतानी संकटामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेवर पिकांची लागवड केली आहे. रब्बी व बागायती पिके हातातोंडाशी आलेली असतानाच विजेच्या लपंडावाचा सामना परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु, संबंधित विभागाने दखल न घेतल्याने सध्या विहिरींमध्ये मुबलक पाणी असले तरी विजेअभावी ते शेतातील पिकांना देता येत नाही, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा सहायक अभियंता एस. पी. ढगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनावर बाळासाहेब भदाणे, पंडित वाघ, बाळासाहेब मोरे, योगेश मोरे, राजेंद्र पाटील, दौलत पवार, घनशाम सोनवणे, रंजित चव्हाण आदिंसह कनाशी परिसरातील शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या
आहेत. (वार्ताहर)