थकबाकीदारांविरोधात अपात्रतेची कारवाई
By Admin | Updated: April 28, 2017 01:39 IST2017-04-28T01:39:02+5:302017-04-28T01:39:13+5:30
येवला : आगामी २०१७च्या खरीप हंगामासाठी कर्जवाटप होत नसल्याने, जिल्हा बँकेला सर्वसामान्य सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

थकबाकीदारांविरोधात अपात्रतेची कारवाई
येवला : पाचशे आणि हजाराच्या नोटाबदलीनंतर अडचणीत असलेल्या मागील खरीप हंगामातील कर्जरक्कम भरणा करूनही आगामी २०१७च्या खरीप हंगामासाठी कर्जवाटप होत नसल्याने, जिल्हा बँकेला सर्वसामान्य सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सहकार खाते आणि जिल्हा बँकेचे अधिकारी यांनी थकबाकीदार सोसायटी संचालकांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासाठी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांना साकडे घातले आहे.
येवला तालुका सहकारी संस्था सहायक निबंधक, जिल्हा बँकेचे अधिकारी यांनी मंगळवारी दिवसभर सहायक निबंधक कार्यालयात दिवसभर तळ ठोकून होते. ८२ पैकी २३ विविध कार्यकारी सोसायटींच्या १५२ संचालकांकडे असणारी २ कोटी १० लाख १० हजार रकमेच्या वसुलीसाठी संबंधित संस्थेच्या सचिवाला बोलावून थकबाकीदर संचालकांची माहिती गोळा केली. या १५२ संचालकांना सहकार अधिनियम अन्वये सुनावणी नोटिसा दिल्या जाणार असल्याचे विभागीय अधिकारी एस. एस. पैठणकर यांनी सांगितले. सुनावणी नोटिसीनुसार, सहकारी सोसायटीचे जे संचालक ८ मे पर्यंत थकबाकी कर्ज रकमेचा भरणा करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. (वार्ताहर)