संचालक बरखास्ती : १४ ला सुनावणी
By Admin | Updated: June 28, 2017 00:51 IST2017-06-28T00:51:46+5:302017-06-28T00:51:59+5:30
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना बरखास्तीच्या नोटिसां-प्रकरणातील सुनावणी १४ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे

संचालक बरखास्ती : १४ ला सुनावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना बरखास्तीच्या नोटिसां-प्रकरणातील सुनावणी १४ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बाजार समितीच्या १८ संचालकांनी सुनावणी-दरम्यान त्यांचा लेखी खुलासा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्याकडे सादर केल्यानंतर या प्रकरणात मंगळवारी (दि. २७) सुनावणी होणार होती. परंतु, आता ही सुनावणी १४ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने बाजार समिती संचालकांनाही १४ जुलैपर्यंत अभय मिळाले आहे. दरम्यान, १४ जुलैपर्यंत बाजार समितीत सत्ताबदल घडवून आणण्यासाठी इतर गट सक्रिय झाल्याचे वृत्त असून, त्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बाजार समिती संचालकांनी बरखास्तीच्या नोटिसींना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली असून, मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा उपनिबंधकांना बाजार समितीबाबत घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी ६ जुलैपर्यंत करू नये, असे स्थगिती आदेश दिल्याचे बाजार समितीच्या संचालकांनी सांगितले. त्यामुळे २७ जून रोजी होणाऱ्या सुनावणीबाबत औपचारिकताच उरली होती. १९ जून रोजी सुनावणी न झाल्याने ती सुनावणी २१ जून रोजी ठेवण्यात आली होती. बुधवारी या सुनावणीसाठी बाजार समितीचे प्रभारी सभापती श्याम गावित, उपसभापती शंकर धनवटे यांच्यासह सर्व १८ संचालकांनी त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात सादर केले. बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधीने त्यांचे म्हणणे सादर केले. त्यावर पुढील सुनावणी आता २७ जून रोजी होणार होती. परतु बुधवारी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने तोपर्यंत तरी संचालकांना अभय मिळाले आहे.