मालेगाव बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त
By Admin | Updated: October 9, 2015 22:59 IST2015-10-09T22:59:15+5:302015-10-09T22:59:42+5:30
मालेगाव बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त

मालेगाव बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त
मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील नियुक्त प्रशासकीय संचालक मंडळ बरखास्त करून येत्या चार महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
मालेगाव बाजार समितीवर कॉँग्रेस नियुक्त प्रशासकीय संचालक मंडळ होते. ते हटवून युती शासनाने सहकार राज्यमंत्री भुसे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा-सेना पदाधिकाऱ्यांचे प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त केले होते.
सदर प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्तीविरोधात सामाजिक कार्यकर्ते अशोक आखाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सदर प्रशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती रद्द करून बाजार समितीच्या निवडणुका घ्याव्यात, अशी विनंती केली होती. संचालक मंडळ नियुक्तीनंतर भाजपाच्या संभाजी कापडणीस, नंदू शिरोळे, पवन ठाकरे आदि चौघा संचालकांनी पदाचा राजीनामा दिला होता.
आखाडे यांनी दाखल केलेल्या याचिकेचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील व न्यायमूर्ती शुक्रे यांच्या संयुक्त खंडपिठाने दिला. त्यात कृउबा मालेगाव प्रशासकीय संचालक मंडळ बरखास्त करत येत्या चार महिन्यांच्या आत संचालक मंडळ निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन संचालक मंडळ नियुक्त होईपर्यंत मालेगावच्या सहकारी संस्था उपनिबंधक गौतम बलसाने यांची बाजार समितीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)