ग्रामसभेच्या माहितीबाबत उदासीनता
By Admin | Updated: February 1, 2016 22:26 IST2016-02-01T22:13:20+5:302016-02-01T22:26:48+5:30
कळवण : ७१ ग्रामपंचायतींनी माहिती दिली नसल्याचे उघड

ग्रामसभेच्या माहितीबाबत उदासीनता
कळवण : २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभांमध्ये घेण्यात आलेल्या विषयांबाबत जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पंचायत समितीमार्फत मार्गदर्शन करून १ ते १६ विषय चर्चेत घेऊन ग्रामसभा झाल्यानंतर ३० जानेवारीपर्यंत इतिवृत्त व त्याची माहिती, झालेले ठराव तत्परतेने पंचायत समिती ग्रामपंचायत विभागाला सादर करणे बंधनकारक केले होते; मात्र आठवडा उलटूनही तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींनी माहिती सादर केली नसल्याची बाब समोर आली आहे.
सात दिवसांत फक्त १५ ग्रामपंचायतींनी कळवण पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात माहिती सादर केली असल्याचे समोर आले आहे. येत्या ३ ते ४ दिवसात उर्वरित ग्रामपंचायतीची माहिती मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. मात्र ग्रामसभेच्या माहितीबाबत असलेली उदासीनता समोर आली आहे.
पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाकडून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्याचे आणि तसा अहवाल पाठविण्याचे आदेश काढले होते. त्यासाठी पत्रही पाठविले होते. तालुक्यात ८६ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील प्रथम नागरिक म्हणून ग्रामसभा यशस्वी करण्याच्या दृष्टीने सरपंच यांच्या उपस्थितीत ग्रामसभा १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा शासकीय यंत्रणेने केला असून प्रत्यक्षात ग्रामसभा घेताना नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. (वार्ताहर)
अनेक योजना ,शासनाचा निधी ,याची माहिती ग्रामस्थपर्यंत पोहोचली नसल्याचा दावा केला जात असून, ग्रामसभांमध्ये शासनाच्या योजनाची माहिती तसेच इतर माहिती ग्रामस्थांना दिली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. कळवण पंचायत समितीच्या दप्तरी मात्र कळवण तालुक्यात १०० टक्के ग्रामसभा झाल्याची नोंद आहे. (वार्ताहर)