सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग
By Admin | Updated: October 3, 2015 00:11 IST2015-10-03T00:07:28+5:302015-10-03T00:11:26+5:30
ऊर्जामंत्र्यांची कबुली : दुष्काळप्रश्नी व्यक्त केली चिंता

सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग
नाशिक : सत्तेत येऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटला; मात्र सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नसल्याची कबुली खुद्द ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. तसेच मराठवाडा व विदर्भातील दुष्काळप्रश्नी चिंता व्यक्त करीत यामधून मार्ग काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सूतोवाचही केले.
एका खासगी कार्यक्रमप्रसंगी त्यांनी हे प्रतिपादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अठरा तास कष्ट करीत आहेत. राज्यावरील चार लाख कोटी रुपयांचा कर्जाचा गाडा ओढण्यासाठी मुख्यमंत्री देशोदेशी भ्रमंती करीत आहेत; मात्र जनतेच्या अपेक्षांचे ओझे अधिक असल्याने त्यांना आम्ही अद्यापपर्यंत न्याय देऊ शकलो नाही. मराठवाडा, विदर्भातील भीषण दुष्काळ चिंतेचा विषय असून, यातून मार्ग काढण्यासाठी व महाराष्ट्राला अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. तसेच दुष्काळग्रस्त व आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती अतिशय दयनीय असून, त्यांच्या मदतीसाठी जनतेनी धावून जाण्याची गरज असल्याचे आवाहनही याप्रसंगी केले.