वसूबारस पूजनाने आज होणार दिवाळीला प्रारंभ
By Admin | Updated: November 6, 2015 23:32 IST2015-11-06T23:31:32+5:302015-11-06T23:32:55+5:30
वसूबारस पूजनाने आज होणार दिवाळीला प्रारंभ

वसूबारस पूजनाने आज होणार दिवाळीला प्रारंभ
नाशिक : आश्विन वद्य द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत दिवाळी सण साजरा करण्यात येतो. आश्विन वद्य द्वादशी या दिवशी दिवाळीच्या सणाला सुरुवात होत असून, हा दिवस ‘गोवत्स द्वादशी’ अर्थात वसूबारस म्हणून साजरा केला जातो. यादिवशी पारंपरिक पद्धतीने गायीचे आणि वासराचे पूजन करण्यात येते.
घराघरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठीदेखील प्रसन्न वातावरणात पूजा करण्यात येते. शहराची जशी जशी वाढ होत गेली त्यामुळे शहरातील गोठे नामशेष होऊ लागले. आज शहरात पंचवटी परिसरातील पांजरापोळ, तिडके कॉलनी येथील गुरुगंगेश्वर वेदमंदिर आश्रम, तपोवन येथील कृषी गो-सेवा ट्रस्ट, दिंडोरी येथील नंदिनी गोशाळा येथे आज शनिवार (दि. ७) तर बालाजी मंदिर, गंगापूर धबधब्याजवळील कै. मोरोपंत पिंगळे गोशाळेत रविवार (दि.८) पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात येणार असून, शहरातील नागरिकांसाठीदेखील पूजा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिवाळीला याच दिवसापासून सुरुवात होत असल्याने याच दिवसापासून मोठ्या आणि आकर्षक रांगोळ्या काढण्यासाठी महिलांमध्ये विशेष उत्साह आणि लगबग बघायला मिळते. वसूबारस या दिवशी बहुतेक स्त्रियांचा उपवास असतो. वसूबारसेच्या दिवशी गहू, मूग यांचे सेवन न करता बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाण्याची पौराणिक प्रथा आहे. गाय आणि वासरू यांच्या नात्यातून जो प्रेम आणि जिव्हाळा दिसून येतो त्याचप्रमाणे आपल्या मुलांना उत्तम आरोग्य आणि सुख मिळावे, अशी वसूबारस पुजेमागील अख्यायिका आहे. (प्रतिनिधी)
येथे होणार वसूबारस पूजन
- नाशिक पांजरापोळ, निमाणी, पंचवटी.
- गुरू गंगेश्वर वेद मंदिर आश्रम, त्र्यंबकरोड, तिडके कॉलनी.
- कृषी गो-सेवा ट्रस्ट, तपोवन, पंचवटी.
- कै. मोरोपंत पिंगळे गोशाळा, बालाजी मंदिर, गंगापूर धबधब्याजवळ, गंगापूर रोड.
- ४नंदिनी गोशाळा, नाशिक- पेठ रोड, उमराळे, दिंडोरी.