नाशिकरोड प्रभाग बैठकीत विविध विषयांवर चर्चा
By Admin | Updated: February 3, 2016 22:41 IST2016-02-03T22:39:21+5:302016-02-03T22:41:50+5:30
नाशिकरोड प्रभाग बैठकीत विविध विषयांवर चर्चा

नाशिकरोड प्रभाग बैठकीत विविध विषयांवर चर्चा
नाशिकरोड : प्रभाग समितीच्या बैठकीत सार्वजनिक शौचालयाची झालेली दुरवस्था, बंद पथदीप, अतिक्रमण, स्वच्छता आदि विषयांवर गरमागरम चर्चा झाली.
नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक बुधवारी दुपारी प्रभाग सभापती केशव पोरजे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रारंभी माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर, पत्रकार दत्ता कपिले यांना श्रद्धांजली वाहून बैठक ५ मिनिटे तहकूब करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सभेच्या कामकाजास प्रारंभ झाला.
यावेळी झोपडपट्टी, गावठाण भागातील सार्वजनिक शौचालयाची झालेली दुर्दशा, आरोग्य विभागाने आठ महिन्यांपूर्वी बांधकाम विभागाला दुरुस्तीचे पत्र देऊनसुद्धा काम करण्यास होणारी टाळाटाळ यामुळे नागरिकांचा पत्करावा लागणारा रोष यावरून नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सार्वजनिक शौचालयाचा सर्व्हे करून १५ दिवसांच्या आत कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. यावेळी विषयपत्रिकेवरील कामांना प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली. यावेळी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांचा प्रभाग सभापती केशव पोरजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीला नगरसेवक अशोक सातभाई, सूर्यकांत लवटे, हरिष भडांगे, संभाजी मोरूस्कर, सुनीता कोठुळे, ललित भालेराव, शोभना शिंदे, सविता दलवाणी, वैशाली भागवत, वैशाली दाणी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)