झिरेपिंपळ येथे चर्चा : बांधकामाची परवानगी दिली कोणी?
By Admin | Updated: July 30, 2014 00:17 IST2014-07-30T00:02:43+5:302014-07-30T00:17:37+5:30
खासगी जागेत शासकीय इमारती

झिरेपिंपळ येथे चर्चा : बांधकामाची परवानगी दिली कोणी?
लोहोणेर : देवळा तालुक्यातील झिरेपिंपळ (विठेवाडी) येथील ३३१ या खासगी मालकीच्या गट नंबरमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा इमारत ७ ते ८ बेघर इमारत, पाच खासगी घरांसह एक अंगणवाडी आदि शासनाच्या अधिपत्याखालील इमारती व इमले उभे करण्यात आले असून, या खासगी जागेत शासकीय इमारत बांधकामांना कोणी परवानगी दिली. याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
झिरेपिंपळ शिवारातील गट नं. ३३१ हा खासगी ११ मालकीचा असून, यातील काही मालक मयत झाले आहेत, तर काही हयात आहेत. एकूण २ हेक्टर १२ गुंठे क्षेत्रफळ असलेला हा गटनंबर ५० वर्षांपासून बेवारस होता. या जागेवर ज्याच्या मनात येईल त्यांनी आपल्या मनमानी कारभाराने बांधकाम केले इतकेच नव्हेतर स्थानिक ग्रामपंचायतीने कोणत्याही कागदपत्रांची शहनिशा न करता ७ ते ८ इंदिरा आवास घरकुलांच्या बांधकामांना परवानगी दिल्याने या जागेवर बेघरांची बांधकामे करण्यात आली, तर जि. प.च्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या तीन खोल्यांची इमारतही उभी केली असून, चिमुकल्यांच्या शिक्षणांसाठी अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. काही खासगी घरांसह दोन पिठाच्या गिरण्याही या ठिकाणी सुरू आहेत. जर ही जागा खासगी मालकीची होती, तर या ठिकाणी करण्यात आलेली शाळा, बेघर वस्ती, अंगणवाडी इमारतीच्या बांधकामांना परवानगी दिली कोणी? हा प्रश्न उपस्थित राहत आहे.
सद्यस्थितीला या जागेवर नव्याने अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्याचे उद्घाटन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. मात्र उद्घाटनानंतर हे काम वादादीत ठरले असून, या बांधकामाला वेळोवेळी अडथळे
निर्माण करण्यात येत आहे. यामुळे हे प्रकरण उघडकीस आले असून,
यामुळे सदर जागेवरील मूळ मालक खडबडून जागे झाले आहेत.
आपल्या खासगी मालकीच्या जागेवर शासकीय, शैक्षणिक इमारतींसह
इतर खासगी बांधकामे झाल्याचे त्यांचे लक्षात येताच त्यांनी या जागेसंदर्भातील कागदपत्रांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. या वादादीत
जागेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसह अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले असून, या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)