आरोग्याच्या प्रश्नावरून प्रभाग सभा तहकूब
By Admin | Updated: November 2, 2015 22:18 IST2015-11-02T22:17:44+5:302015-11-02T22:18:14+5:30
पंचवटी : नगरसेवक अधिकाऱ्यांवर नाराज

आरोग्याच्या प्रश्नावरून प्रभाग सभा तहकूब
पंचवटी : गेल्या अनेक दिवसांपासून पंचवटी विभागात घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासन विशेषत: आरोग्य विभाग नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप करीत लोकप्रतिनिधींनी प्रभाग समितीची मासिक बैठक तहकूब केली.
पंचवटी प्रभागाची मासिक बैठक सभापती सुनीता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभीच उपमहापौर गुरुमित बग्गा, गटनेता कविता कर्डक, रंजना भानसी, रूपाली गावंड, मनीषा हेकरे, सिंधू खोडे, विमल पाटील, शालिनी पवार आदि सदस्यांनी प्रभागात घंटागाडी येतच नसल्याची तक्रार केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने प्रभागात जवळपास सात ते आठ घंटागाड्या बंद असल्याचे स्पष्ट केल्याने लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीला बोलवावे, असे सुचविले. चार ते पाच दिवसांवर दीपावलीचा सण आला असला तरी आरोग्य विभागाकडून स्वच्छतेबाबत कोणतेही नियोजन नाही. त्यातच किती घंटागाड्या सुरू आणि किती बंद याबाबत कोणालाच काही माहीत नसल्याचे सांगत नागरी समस्या सुटणार नसतील तर प्रभाग बैठक कशासाठी, असा सवाल करून संतप्त लोकप्रतिनिधींनी प्रभागाच्या बैठकीवर एक प्रकारे बहिष्कार टाकून प्रभाग सभा तहकूब केली. आगामी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती न दिल्यास पुन्हा सभा तहकूब केली जाईल, असा इशारा लोकप्रतिनिधींनी यावेळी दिला.
प्रभाग बैठक तहकूब केल्याने विषयपत्रिकेवरील कोणत्याही प्रकारचे विषय मंजूर झाले नाही. (वार्ताहर)