समन्यायी पाणीवाटप धोरणावर होणार फेरविचार
By Admin | Updated: November 8, 2015 00:01 IST2015-11-07T23:59:28+5:302015-11-08T00:01:30+5:30
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : भाजपा आमदारांनी घेतली भेट

समन्यायी पाणीवाटप धोरणावर होणार फेरविचार
नाशिक : समन्यायी पाणीवाटपाचे धोरण हे नाशिककरांवर अन्याय करणारे आहे, त्यामुळे त्यात बदल करावा, अशी मागणी भाजपा आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. फडणवीस यांनीही या विषयावर अधिवेशनात चर्चा करू, असे आश्वासन दिले आहे.
मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणानुसार नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्यात आले आहे; परंतु त्यामुळे नाशिकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपावगळता सर्वपक्षीयांनी आंदोलन केले. भाजपाची सत्ता असताना त्यांनी मौन बाळगल्याने अन्य पक्षांनी भाजपा आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले होते. त्यामुळे भाजपाचे आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, डॉ. राहुल अहेर आणि दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी पाणी सोडताना नाशिकचा विचार योग्य पद्धतीने झालेला नाही. नाशिक जिल्'ासाठीच पुरेसे पाणी नसतानादेखील मराठवाड्यासाठी सोडण्यात आले. नाशिकमध्ये द्राक्षबागा लावलेला भाग मोठा असून, त्यांना पाणी न दिल्यास हजारो कोटी रुपयांचे नुकसान होईल, अशी तक्रार आमदारांनी केली. उच्च न्यायालयाने पिण्यासाठीच पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर हे पाणी पिण्यासाठीच सोडले जात असताना प्रत्यक्षात मात्र हे पाणी मद्याचे कारखान्यांसाठी वापरले जात आहे, त्यामुळे त्याचे नियंत्रण करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी एका समितीमार्फत पाण्याचा वापरावर देखरेख केली जाईल, असे सांगितले. तसेच समन्यायी पाणीवाटप धोरणात नाशिकवर अन्याय होत असल्याने या धोरणाचा फेरविचार करावा त्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा करावी, अशी आमदारांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे सांगण्यात आले.