नाशिकमध्ये पुन्हा दामदुप्पट योजनेची चर्चा

By Admin | Updated: May 10, 2015 00:12 IST2015-05-10T00:09:51+5:302015-05-10T00:12:29+5:30

ट्रिपल एम : एका महिन्यात दुप्पट परतावा देण्याचा दावा

Discussion of Damprupup scheme again in Nashik | नाशिकमध्ये पुन्हा दामदुप्पट योजनेची चर्चा

नाशिकमध्ये पुन्हा दामदुप्पट योजनेची चर्चा

नाशिक : विविध प्रकारच्या गुंतवणूक आणि आकर्षक व्याजदराच्या चक्रव्यूहात अडकलेल्या नाशिककर गुंतवणूकदारांना गेल्या काही दिवसांपासून ट्रिपल एम या संस्थेच्या नावाचा आणखी एक मॅसेज येऊ लागला असून, त्या मॅसेजमध्ये अवघ्या महिनाभरात थेट दामदुप्पट रक्कम देण्याचा दावा करण्यात येत असल्याने सध्या नाशिककरांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.
एका महिन्यात ३० टक्क्यांपासून ते १०० टक्केपरतावा देण्याचा दावा करणाऱ्या या संस्थेच्या नावाने एक संकेतस्थळही कार्यरत असून, ‘एमएमएमइंडिया.नेट’ या नावाने ते सुरू आहे. संकेतस्थळावर संस्थेने टाकलेल्या माहितीपत्रकात बॅँक अथवा कंपनी असल्याचा उल्लेख कोठेही आढळत नाही. एका ठिकाणी ही संस्था फायनान्स कंपनी असल्याचा उल्लेख करते, मात्र त्यातही भारतीय कंपनी की, परदेशी कंपनी याचा उल्लेख नाही. कंपनीचा रजिस्टर क्रमांकही त्यात जाहीर करण्यात आलेला नसल्याने याबद्दल अधिकच साशंकता निर्माण होते.
पैसे भरायचे कसे, त्याची परतफेड कशी होणार याबाबत कोणतीही माहिती या संकेतस्थळावर देण्यात आलेली नाही. केवळ एक व्यक्ती यात आॅनलाइन समुपदेशन करीत गुंतवणूकदाराने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देते. पैसे कसे मिळणार असे विचारले असता बॅँकेद्वारे तुमच्या खात्यावर जमा होतील असे उत्तर दिले जाते. यापेक्षा अधिक माहिती पाहिजे असेल तर तुमचा ई-मेल आयडी पाठवा, त्यावर माहिती पाठवू इतकेच उत्तर दिले जाते आणि ई-मेलवर काही लिंक पाठविल्या जातात. त्याद्वारे तुमचे अकाउंट उघडा व व्यवहार सुरू करा, अशी माहिती दिली जाते.
कार्यालय पंजाबला
या संस्थेचा व्यवहार संपूर्ण जगभरात चालविला जात असून, त्याचे कार्यालय केवळ पंजाबमध्येच असल्याचे उत्तर दिले जाते. त्यामुळे कागदपत्रांचे कोणतेच वास्तविक रेकॉर्ड नसणाऱ्या या संस्थेचे व्यवहार चालतात तरी कसे याबद्दल कोणतीच माहिती नव्या गुंतवणूकदाराला दिली जात नाही. केवळ इंटरनेटवरच आॅनलाइन माहिती दिली जाते.
५०० रुपयांपासून सुरुवात
महिनाभरात दामदुप्पट या योजनेअंतर्गत सहभागी होणाऱ्या गुंतवणूकदाराला किमान ५०० रुपये गुंतवावे लागतात, तर या पटीत अमेरिकन डॉलरमध्येही गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवर बोनस देण्यात येत असल्याचेही कंपनीकडून सांगितले जाते. त्यावर बोनस आणि रकमेची परतफेड कशी होते हे दाखविणाऱ्या अनेक चित्रफित संकेतस्थळावर टाकण्यात आल्या असून, त्याद्वारे त्याची माहिती दिली जाते. परंतु त्यातील एकही माणूस परिचित अथवा खात्रीशिररीत्या सांगतो आहे असे वाटत नाही. तो केवळ जाहिरातीचाच एक भाग वाटतो.
माहितीही संदिग्ध
या संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली माहितीही संदिग्ध स्वरूपातील असून, त्यातून कोणत्याच व्यवसायाचा बोध होत नाही. या रकमेचा वापर संस्था कशी करते? त्यातून इतक्या कमी कालावधीत दुप्पट परतावा कसा मिळतो, यासाठी संस्था पैसे कोठे वापरते याची कोणतीही माहिती संस्थेचे एजंट देत नाहीत. महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये या संस्थेचा कारभार विस्तारलेला नसल्याने त्याची माहिती अद्याप कोणालाच नाही. त्यामुळे या संस्थेच्या विश्वासार्हतेबद्दलही साशंकता निर्माण होते आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Discussion of Damprupup scheme again in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.