बंद दरवाजाआड सिंहस्थ कामांची चर्चा

By Admin | Updated: January 10, 2015 00:43 IST2015-01-10T00:43:25+5:302015-01-10T00:43:35+5:30

भूसंपादनाचे गौडबंगाल : महापौर-उपमहापौरांचे गुफ्तगु; गटनेत्यांसह अन्य पदाधिकारीही बैठकीविषयी अंधारात

Discussion of closed door and Simhastha work | बंद दरवाजाआड सिंहस्थ कामांची चर्चा

बंद दरवाजाआड सिंहस्थ कामांची चर्चा

नाशिक : राज्य शासनाने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या निधीचा ७५ टक्के वाटा उचलण्याचे ठरविल्याने उत्साहात आलेल्या महापौर-उपमहापौर या दुकलीने स्थायी समिती सभापतीला सोबत घेत येणाऱ्या गंगाजळीचा ‘विनियोग’ नेमका कशासाठी करायचा याचे बंद दरवाजाआड गुफ्तगु केले आणि अधिकाऱ्यांनाही कामांना गती देण्याची सूचना करत ‘गतिमानते’ची आपली ‘अगतिकता’ही दाखवून दिली. स्थायी समितीने कोट्यवधी रुपयांचे भूसंपादनाचे प्रस्ताव फेटाळून लावल्याने त्यापाठीमागचे गौडबंगाल या तातडीने बोलविण्यात आलेल्या बैठकीत दडल्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे प्रसिद्धी माध्यमांना अगोदर बैठकीचे आवतण देऊन नंतर त्यांच्याशिवाय बैठक पार पाडण्याचे कौशल्यही या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले असले तरी घरभेदीही असतात, याचे भान मात्र दुकलीला राहिलेले दिसत नाही.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने २५ टक्के निधी उपलब्ध करून देताना ७५ टक्के निधीचा भार राज्य शासनाने सोसण्याची तयारी पालकमंत्र्यांनी दर्शविली आहे. त्यामुळे महापालिकेला सुमारे ६५० कोटी रुपये मिळणार आहेत. राजा उदार झाल्याने भारावलेल्या महापौर-उपमहापौर या दुकलीने सकाळी तातडीने निरोप देत अधिकाऱ्यांची सिंहस्थ कामांसंदर्भात आढावा बैठक बोलविली.
महापौर एकदम ‘जागरूक’ झाल्याने अधिकारीही बुचकळ्यात पडले आणि बैठकीचा नेमका हेतू काय, याविषयी बराच वेळ महापौरांच्या दालनात घुटमळत बसले. सकाळी ११ वाजता बैठकीचे निरोप अधिकाऱ्यांना गेले तसे प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही पाठविण्यात आले. नियोजित वेळेपेक्षा तब्बल तासाभराने महापौर बैठकीसाठी दालनात अवतरले. त्यापाठोपाठ उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती आल्यानंतर महापौरांनी सर्व अधिकाऱ्यांना कॅबिनमध्ये आत बोलावून घेत बंद दरवाजाआड चर्चा सुरू केली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीचा वृत्तांत अधिकृतपणे महापौर-उपमहापौर या दुकलीने माध्यमांना कळविला नसला तरी बंद दरवाजाआड भूसंपादनाचा विषय अजेंड्यावर चर्चिला गेल्याचे कळते.
स्थायी समितीने दोन दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे भूसंपादनाचे प्रस्ताव फेटाळून लावले आहेत. त्यामुळे कोणते भूसंपादनाचे प्रस्ताव स्वीकारायचे अथवा कोणते नाकारायचे यावर खल झाल्याचे कळते.
बैठकीदरम्यानच महापौर-उपमहापौर यांच्या दालनाबाहेर काही बांधकाम व्यावसायिकांचाही संचार दिसून आल्याने बंद दरवाजाआड झालेल्या बैठकीच्या चर्चेला पुष्टीच मिळाली. (प्रतिनिधी)

Web Title: Discussion of closed door and Simhastha work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.