अन् चर्चा नरेंद्र मोदींच्या नाशिक दौर्याची
By Admin | Updated: May 27, 2014 01:11 IST2014-05-27T01:02:02+5:302014-05-27T01:11:22+5:30
नाशिक : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि मग त्यांच्या गुणगानाची चर्चा सुरू झाली. नाशिक भाजपा तर इतक्या उत्साहात आहे की, मोदींच्या परवानगीशिवाय त्यांच्या भेटीची तारीख मुकरर केली. इतकेच नव्हे तर नाशिक भेटीचीही घोषणा करून टाकली.

अन् चर्चा नरेंद्र मोदींच्या नाशिक दौर्याची
नाशिक : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि मग त्यांच्या गुणगानाची चर्चा सुरू झाली. नाशिक भाजपा तर इतक्या उत्साहात आहे की, मोदींच्या परवानगीशिवाय त्यांच्या भेटीची तारीख मुकरर केली. इतकेच नव्हे तर नाशिक भेटीचीही घोषणा करून टाकली.
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा अवकाश त्यांच्या चाहत्यांपेक्षा त्यांच्याशी जवळीक साधणार्यांची माध्यमांकडे गर्दी होऊ लागली आहे. मोदींची आणि आपली भेट, त्यांच्याशी झालेला संवाद किंवा अन्य प्रसंगाच्या निमित्ताने आलेला संपर्क असे अनेक जण उत्साहात सांगत असतात. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी अनेक जण आसुसले असणार, त्यात स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा समावेश असून ते स्वाभाविकही आहे. त्यासाठी आता कुंभमेळ्याचे निमित्त शोधण्यात आले आहे. मग, शपथविधी कधी संपतो ना कधी नाही, असे झाल्यास नवल वाटणार नाही. तरीही नाशिकचे उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी मोदींना भेटण्यासाठी कुंभमेळ्याचे कारण आणि भेटीचा मुहूर्त जाहीर केला आहे. कुंभमेळ्यात नाशिकला जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी येत्या १५ जून रोजी भाजपाचे प्रतिनिधी मंडळ मोदी यांची भेट घेणार आहेत. अर्थात, भेटीचा हा मुहूर्त मोदी यांना माहिती आहे किंवा नाही हे ज्ञात नाही. तथापि, कुलकर्णी यांनी तसे जाहीर करून टाकले आहे. त्याविषयीदेखील ना नाही परंतु आता याच उपमहापौरांनी मोदी यांची नाशिक भेटीचीदेखील वाच्यता करून टाकली आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी मोदी जून महिन्यात नाशिकला भेट देणार असून, तसे उपमहापौरांनीच स्पष्ट केल्याचे काही मुंबईच्या मुद्रीत माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे मोदींचे समर्थक भारावून गेले असून, पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. मोदी भेटीचा मागोवा घेणार्या उपमहापौरांनी कानावरच हात ठेवले आहेत. आपण अशी माहितीच दिली नाही, ज्यांनी चुकीची चर्चा पसरवली ते आपल्याला कधीही भेटले नाहीत, आपण फक्त १५ जून रोजी दिल्लीत मोदी यांची भेट घेण्याचेच जाहीर केले होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, ही तारीख तरी कशी मुकरर झाली, हे मात्र ते सांगू शकले नाही.