अभिरुची उंचावण्यासाठी व्हावेत प्रयत्न चर्चा
By Admin | Updated: October 17, 2015 23:51 IST2015-10-17T23:50:06+5:302015-10-17T23:51:00+5:30
सत्रातील सूर : साहित्य, संस्कृती, कला व शासकीय धोरणावर मान्यवरांनी कार्यक्रमात मांडली अभ्यासपूर्ण मते

अभिरुची उंचावण्यासाठी व्हावेत प्रयत्न चर्चा
नाशिक : समाजाची कलेच्या प्रत्येक क्षेत्रातील सरासरी अभिरुची चिंताजनक अवस्थेत असून, ती उंचावण्यासाठी कलावंत, लोक व शासनाच्या वतीने प्रयत्न होण्याची गरज असल्याचा सूर चर्चासत्रात निघाला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्र २०२५ : साहित्य, संस्कृती व कला : सामाजिक पर्यावरण आणि शासकीय धोरण’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन कुसुमाग्रज स्मारकात आज करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेत अभ्यासपूर्ण मते मांडली. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे उपस्थित होते. चर्चासत्राचे बीजभाषण ज्येष्ठ समीक्षक संजय भास्कर जोशी यांनी केले. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी साहित्य, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी नाटक, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी चित्रपट, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांनी चित्रकला-शिल्पकला, तर ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे यांनी संगीत या विषयावर मते मांडली.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी स्वागत केले. यशवंतराव प्रतिष्ठानचे सचिव शरद काळे यांनी चर्चासत्रामागील भूमिका मांडली. विनायकदादा पाटील यांनी प्रास्ताविक केले. आमदार हेमंत टकले यांनी समारोपाचे भाषण केले. लोकेश शेवडे यांनी सूत्रसंचालन केले. सदा डुंबरे यांनी आभार मानले.