शैव-वैष्णव पंथियांमधील भेदाभेद
By Admin | Updated: July 15, 2015 02:11 IST2015-07-15T02:10:42+5:302015-07-15T02:11:04+5:30
शैव-वैष्णव पंथियांमधील भेदाभेद

शैव-वैष्णव पंथियांमधील भेदाभेद
नाशिक : सिंहस्थ ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला शहरातून काढण्यात आलेल्या धर्मध्वजाच्या मिरवणुकीत वैष्णव पंथीय चालतात मात्र दुसऱ्या दिवशीच्या ध्वजारोहणाप्रसंगी महंत ग्यानदास वैष्णवपंथीय असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्टेजवर जाण्यास मज्जाव करण्यास सांगतात व विशेष म्हणजे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्लही ग्यानदासांचेच ऐकत असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर येथील श्रीराम शक्तिपीठ ब्रह्मचारी आश्रमाचे धर्माचार्य महंत श्री सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे़ महंत सोमश्वरानंद म्हणाले की, पुरोहित संघाच्या ध्वजारोहणाला येण्यास महंत ग्यानदास नाटक करीत होते़ मात्र, श्रीराम शक्तिपीठाला पुरोहित संघाने आमंत्रण दिल्याने शैव-वैष्णव पंथियांमधील भेदाभेद कमी करण्यासाठी ही नामी संधी आहे हे समजून आम्ही सोमवारी काढण्यात आलेल्या धर्मध्वजाच्या मिरवणुकीत आपल्या शिष्यगनांसह सहभागी झालो़ तसेच भक्तांमुळे या मिरवणुकीला खऱ्या अर्थाने रंग भरला गेला़ त्यातच पुरोहित संघाने ध्वजारोहणाचे निमंत्रण दिल्यानेच मी शिष्यगणांसह कार्यक्रमासाठी आलो़ ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री तसेच नेतेमंडळी येणार असून, त्यांच्या हस्ते महंतांचा सत्कार होणार असल्याचे सांगून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याची गळ पुरोहित संघाने घातल्याने या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहिलो़ मात्र सकाळीच पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश कुलकर्णी यांना महंत ग्यानदास यांनी फोन करून आम्हाला या व्यासपीठावर घेऊ नका, असे दरडावले़ विशेष म्हणजे शुक्ल यांनीही त्यांची आज्ञा मानून आम्हाला पोलिसांना रोखण्यास सांगितले़
वास्तविक पाहता पुरोहित संघांचा हा कार्यक्रम असल्याने या व्यासपीठावर कुणाला बसू द्यायचे याचा सर्वस्वी निर्णय शुक्ल यांनी घ्यावयास हवा होता़ मात्र त्यांनीही ग्यानदासांच्याच आज्ञेचे पालन केले़ आमचा अपमानच करायचा होता तर आम्हाला आमंत्रण कशाला दिले असा सवालही महंत सोमेश्वरानंद सरस्वती यांनी उपस्थित करून शैव - वैष्णव महंतांना एका व्यासपीठावर येण्यास मज्जाव करण्याची खेळी करणाऱ्या महंत ग्यानदासांची ‘अक्कल’ काढली़ (प्रतिनिधी)