पाणीपट्टी मुदतीत भरणाऱ्यांना सवलत

By Admin | Updated: February 8, 2016 23:11 IST2016-02-08T23:01:10+5:302016-02-08T23:11:31+5:30

महापालिका : थकबाकीदारांना २ टक्के शास्ती

Discounts to waterpelt deadlines | पाणीपट्टी मुदतीत भरणाऱ्यांना सवलत

पाणीपट्टी मुदतीत भरणाऱ्यांना सवलत

नाशिक : मागील वर्षी महापालिकेने घरपट्टी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत भरणाऱ्या ग्राहकांना सवलत योजना लागू केल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. घरपट्टीच्याच धर्तीवर आता महापालिकेने पाणीपट्टीची देयके मिळाल्यापासून ४० दिवसांच्या आत भरणाऱ्यांना एक टक्का सवलत योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांना मात्र २ टक्के शास्ती लावली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
महापालिकेकडून ग्राहकांना घरपट्टीची बिले पाठविली जातात, परंतु देयके मिळूनही ग्राहकांकडून त्याचा भरणा करण्यासाठी मार्चपर्यंत प्रतीक्षा केली जाते. त्यासाठीच मागच्या वर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत घरपट्टी भरणाऱ्या ग्राहकांना महापालिकेने २ ते ५ टक्क्यांपर्यंत सवलत योजना लागू केली होती. त्यामुळे महापालिकेकडे तीन महिन्यांतच ३२ कोटी रुपयांची वसुली झाली होती. आता घरपट्टीच्या सवलत योजनेच्या धर्तीवर महापालिकेने पाणीपट्टीही देयके मिळाल्यापासून ४० दिवसांच्या आत भरणा केल्यास संबंधित ग्राहकांना पाणीपट्टीत १ टक्के सवलत दिली जाणार आहे. मुदतीनंतर बिल भरणाऱ्या ग्राहकांना मात्र २ टक्के शास्ती केली जाणार आहे. सदर निर्णयाची अंमलबजावणी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून केली जाणार आहे.
शहरात १ लाख ९२ हजार नळजोडणी धारक आहेत. त्याचबरोबर जे ग्राहक आॅनलाइन करभरणा करतील त्यांनाही घरपट्टीत १ टक्का, तर पाणीपट्टीत अर्धा टक्का विशेष सवलत दिली जाणार आहे. महापालिकेमार्फत ग्राहकांना घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा झाल्यानंतर पावती दिली जाते. सदर पावतीसाठी महापालिकेला सुमारे ७० ते ७५ रुपये खर्च येतो. आॅनलाइन करभरणामुळे महापालिकेचा स्टेशनरीवरील खर्च वाचणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Discounts to waterpelt deadlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.