थकीत भविष्य निर्वाह निधीसाठी सवलत
By Admin | Updated: January 7, 2017 00:59 IST2017-01-07T00:59:19+5:302017-01-07T00:59:29+5:30
थकीत भविष्य निर्वाह निधीसाठी सवलत

थकीत भविष्य निर्वाह निधीसाठी सवलत
सातपूर : एप्रिल २००९ ते डिसेंबर २०१६ दरम्यान ज्यांनी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा केला नसेल त्यांच्यासाठी केंद्र सरकारने ३१ मार्चअखेर निधी जमा करण्याची सवलत दिली आहे. या सवलतीचा लाभ घ्यावा अन्यथा अशा आस्थापनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भविष्य निर्वाह निधी आयुक्त अरुण कुमार यांनी दिली आहे.
कामगार कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अजूनही विविध क्षेत्रांतील कामगार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम संबंधित मालकांनी कार्यालयाकडे जमा केलेली नाही, असे लक्षात आले आहे. अशा मालकांना एक संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. दि. १ एप्रिल २००९ ते दि. ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान ज्या मालकांनी कामगारांचा पीएफ जमा केला नसेल त्यांनी निधी कार्यालयाकडे निधी जमा करणार असल्याचे घोषित करावे. पंधरा दिवसांच्या आत पीएफची रक्कम जमा करावी. मालकांसाठी ३१ मार्चपर्यंत शेवटची मुदत देण्यात येत आहे. विशेषत: बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. पीएफची रक्कम चुकविणाऱ्यांसाठी ही मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.