बॉश एम्प्लॉईजच्या पदाधिकाऱ्यांवर अविश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2016 00:15 IST2016-04-05T00:03:32+5:302016-04-05T00:15:54+5:30
प्रतिसभेत नवीन ठराव : करार अंमलबजावणीवरून सर्वसाधारण सभेत गोंधळ

बॉश एम्प्लॉईजच्या पदाधिकाऱ्यांवर अविश्वास
नशिक : बॉश एम्प्लॉईज युनियन व व्यवस्थापन यांच्यात झालेल्या कराराची व्यवस्थापनाकडून अंमलबजावणी होत नसल्याचे सांगत युनियनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांविरोधात काही सभासदांनी गोंधळ घातल्याने अध्यक्ष हेमंत अहेर यांनी सभा गुंडाळली. दरम्यान, संतप्त कामगारांनी ज्येष्ठ कामगार सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिसभा घेत सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव मंजूर करून घेतला. या गोंधळामुळे युनियनमध्ये उभी फूट पडली असून, संघटनेमधील अंतर्गत वातावरण चिघळण्याचे संकेत मिळत आहे.
दादासाहेब गायकवाड सभागृहात रविवारी सकाळी बॉश एम्प्लॉईज युनियनची सभा पार पडली. व्यासपीठावर अध्यक्ष हेमंत आहेर, जनरल सेक्रेटरी श्रीकृष्ण कुलकर्णी, उपाध्यक्ष आशिष शिंपी, नंदलाल आहिरे आदि उपस्थित होते. सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी कामगार हिताच्या मुद्द्यांची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप केला. काही सभासदांनी सर्वसाधारण सभेदरम्यान इतिवृत्ताचे वाचन सुरू असताना घोषणाबाजी करीत उपस्थित मुद्द्यांचा समर्पक खुलासा होत नसल्याचे सांगत व्यासपीठाभोवती घेराव घालून पदाधिकाऱ्यांच्या हातातील माईक घेण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ वाढला. त्यामुळे अध्यक्ष हेमंत अहेर यांनी सभा आटोपती घेतली.
त्यानंतर विरोधी गटाने ज्येष्ठ कामगार सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसभा घेतली़ यावेळी नवे ठराव मंजूर करण्यात आले. यात विद्यमान पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, पूर्वीच्या करारांची अंमलबजावणी करावी, कामगारांशी संबंधित आर्थिक व्यवहार विद्यमान पदाधिकाऱ्यांसोबत करू नये, विद्यमान सभासदांबाबत अविश्वास असे ठराव करण्यात आले. विरोधी गटातील सभासदांतर्फे प्रवीण पाटील, प्रमोद भालेराव, गजेंद्र गुंजाळ, भाऊसाहेब बोराडे, माणिक बोडके, राजेंद्र देशमुख, सुरेश जाधव आदि उपस्थित होते. दरम्यान, विरोधकांकडे काहीच अजेंडा नव्हता, सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देत असतानाही विरोधकांनी मुद्दाम एकतर्फी गोंधळ घातल्याचे हेमंत अहेर यांनी सांगितले, तर सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर कामगारांचा विश्वास उरलेला नसल्याने त्यांनी नैतिकता दाखवून राजीनामे देऊन निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्याची मागणी विरोधी गटाने केल्याने आगामी काळात युनियनमधील अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)