आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय

By Admin | Updated: September 22, 2015 00:13 IST2015-09-22T00:12:48+5:302015-09-22T00:13:47+5:30

तक्रार : आरोग्याधिकारी गैरहजर; रुग्णांना पाहावी लागते वाट

Disadvantages of patients in health center | आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय

आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय

घोटी : दुर्गम आदिवासी भागातील ग्रामीण आरोग्य सेवेचे दुखणे थांबण्याऐवजी वाढतच असल्याचा प्रत्यय येत आहे. इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागातील महत्त्वपूर्ण आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवा कोलमडली
आहे.
वैतरणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन दिवसापासून वैद्यकीय अधिकारी रजेच्या नावाखाली गायब असल्याचा फटका रोज १००च्या वर रुग्णांना बसत असूनही यंत्रणा बेफिकीर असल्याचे दिसत आहे. रजा कालावधीत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी नेमणूक दिलेले वैद्यकीय अधिकारी बैठकीच्या नावाखाली गायब असल्याचे दिसून आले.
इगतपुरी तालुका आरोग्य कार्यालयाच्या बेफिकिरीमुळे गेल्या महिन्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला होता. तो कायम असल्याची प्रचिती आज दिसून आल्याने आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.
इगतपुरी तालुक्याच्या अतिशय दुर्गम आदिवासी भागातील वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दोन दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी आलेच नसल्याची गंभीर बाब श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांना समजली. त्यांनी त्या ठिकाणी स्वत भेट दिली असता शंभरपेक्षा जास्त विविध स्त्री-पुरूष रुग्णांची गर्दी दिसून आली. त्यांनी अधिक चौकशी केली असता गेल्या २ दिवसांपासून येथील वैद्यकीय अधिकारी आलेच नसल्याची माहिती मिळाली. ते स्वत शासनाच्या जिल्हा आरोग्य समितीचे सदस्य असल्याने त्यांनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला.
वैद्यकीय अधिकारी रजेवर असून नविन वैद्यकीय अधिकारी येतील असे उत्तर त्यांना देण्यात आले. तथापि दिवसभर वाट पाहून कोणीही वैद्यकीय अधिकारी आलेच नसल्याने सर्व रुग्णांची मोठी गैरसोय झाली. परत संपर्क करूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे ऐकायला मिळाली. आरोग्य क्षेत्रातील ज्ञान नसणाऱ्या कर्मचारी लोकांकडून तात्पुरता उपचार करून घेण्याची अफलातून सुचना त्यांना ऐकायला मिळाली. (वार्ताहर)

Web Title: Disadvantages of patients in health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.