पोलिसांची गैरसोय भोजनाची परवड

By Admin | Updated: August 9, 2015 22:53 IST2015-08-09T22:52:03+5:302015-08-09T22:53:04+5:30

दुर्लक्ष : आखाड्यांतच घेताहेत भोजनाचा लाभ

The disadvantage of the police | पोलिसांची गैरसोय भोजनाची परवड

पोलिसांची गैरसोय भोजनाची परवड

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलीस अधिकारी व कर्मचारी शेकडोंच्या संख्येने तपोवन साधुग्राममध्ये दाखल झालेले आहेत. शासनाकडून बंदोबस्तासाठी आलेल्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भोजनाची कोणत्याही प्रकारची व्यवस्था न केल्याने सध्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांची परवड होत आहे.
सध्या परजिल्ह्यातून बंदोबस्तासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तपोवन साधुग्राममध्ये विविध आखाड्यांनी सुरू केलेल्या अन्नछत्रात जाऊनच भोजन करावे लागत असल्याची खंत बंदोबस्तासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबई, जळगाव, धुळे, ठाणे, पुणे आदिंसह राज्यभरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी दाखल झालेले आहेत. पोलीस अधिकारी सध्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, तर कर्मचारी पोलीस मुख्याल्यात राहात आहे. भोजनावळीची व्यवस्था नसल्याने कोणी सकाळचा चहा, नास्ता हॉटेल, तर कुणी जवळ असलेल्या नातेवाइकांकडे करत आहेत. मात्र ज्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक कोणीही नाही अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना थेट साधुग्राममध्ये सुरू असलेल्या अन्नदानछत्रात जाऊनच जेवण करावे लागत आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांना शासनस्तरावर कुंभमेळा कालावधीत ‘मेस’ची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविले. (वार्ताहर)

Web Title: The disadvantage of the police