चांदवड उपजिल्हा रुग्णालयात गैरसोय
By Admin | Updated: September 26, 2016 00:03 IST2016-09-26T00:02:23+5:302016-09-26T00:03:05+5:30
असुविधा : सुविधांबाबत रुग्णांच्या तक्रारी

चांदवड उपजिल्हा रुग्णालयात गैरसोय
चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयात औषध व इतर सुविधा मिळत नसल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष परवेजखान पठाण यांनी एका निवेदनाद्वारे वैैद्यकीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
चांदवड उपजिल्हा रुग्णालयात मशीनद्वारे डेंग्यू आजाराची चाचणी केली जाते. मात्र हे मशीन चुकीचा अहवाल दाखवत असल्याने अधिकारी रुग्णांना नाशिक, पिंपळगाव व मालेगाव येथे घेऊन जाण्यास सांगतात.
यात रुग्णांचे व नातेवाइकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. सामान्य रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार घेणे परवडत नाही. मात्र नाईलाजास्तव त्यांना जादा खर्चाला सामोरे जावे लागत आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी दोन अद्ययावत इमारती उभारल्या असूनही येथे अधिकारी व कर्मचारी राहत नाही. त्यामुळे रात्री-बेरात्री रुग्णांचे हाल होतात. वेळेवर उपचार न मिळाल्याने शहरातील एका शाळकरी विद्यार्थ्याला मृत्यूस सामोरे जावे लागले. वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांना नाईलाजास्तव खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहे. संबंधित विभागाच्या ूउदासीनतेमुळे नागरीकांना अन्याय सहन करावा लागत आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी व ट्रामा केअर सेंटर सुरू करून जनतेला रुग्ण सेवा द्यावी व जास्तीत जास्त औषधे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर परवेज पठाण, नितीन थोरे, अन्वर शहा, नाना विसपुते, आबीद शेख, किशोर चौबे, अयान कुरेशी, रवि बागुल, आप्लेब पठाण, लकी शेख, इम्रान पठाण आदिंच्या सह्या आहेत. (वार्ताहर)
साथीच्या रोगांचे थैमान
चांदवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शासनाने मोठा खर्च करून ट्रामाकेअर इमारतीची उभारणी केली; मात्र शहरासह तालुक्यातील जनतेला त्याचा फायदा केव्हा मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या डेंग्यू व साथीच्या इतर रोगांनी चांदवड शहरामध्ये थैमान घातले आहे.