पालिका कर्मचारी वसाहतीत गढूळ पाण्याचा पुरवठा
By Admin | Updated: May 7, 2017 00:33 IST2017-05-07T00:22:10+5:302017-05-07T00:33:13+5:30
नाशिक : जुने नाशिक परिसरातील ५४ क्वॉर्टर्स या पालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे

पालिका कर्मचारी वसाहतीत गढूळ पाण्याचा पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जुने नाशिक परिसरातील ५४ क्वॉर्टर्स या पालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर मनपाने टॅँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
जुने नाशिकमध्ये ५४ क्वार्टर्स ही पालिका कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. सुमारे ६५० कुटुंबे याठिकाणी वास्तव्यास आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून परिसरात माती व गाळमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे. संतप्त नागरिकांनी महापालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यानंतर महापालिकेने पाण्याचा टॅँकर सुरू केला आहे. परंतु, अद्याप गढूळ पाण्याचा पुरवठा थांबलेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिसरातील ड्रेनेज लाईन फुटून त्याचे पाणी पिण्याच्या पाइपलाइनमध्ये पाझरत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. परंतु, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला मात्र अद्याप समस्या सोडविण्यात यश आलेले नाही. काही लोकांच्या घरांमध्ये घाण पाणी घुसत असल्याच्याही तक्रारी आहेत. महापालिकेने तातडीने परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा व टॅँकरची संख्या वाढवावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.