रिमझिम पावसाने रस्त्याला खड्डे
By Admin | Updated: July 29, 2015 00:24 IST2015-07-28T23:55:18+5:302015-07-29T00:24:44+5:30
रिमझिम पावसाने रस्त्याला खड्डे

रिमझिम पावसाने रस्त्याला खड्डे
नाशिक : शहरात अद्याप मुसळधार पावसाने हजेरी लावली नसली तरी दोन दिवसांपासून काही मिनिटांपर्यंत पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहे. अशा हलक्या पावसाच्या सरींमुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडून चाळण होण्यास सुरुवात झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हलक्या सरींनी जर रस्त्यांची दैना होत असेल तर मुसळधार पावसामध्ये शहराच्या रस्त्यांचे चित्र क से असेल याची कल्पना करणेच अवघड असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.
पावसाने जोरदार हजेरी लावली नसली तरी शहरातील विविध भागांमधील रस्त्यांवर खड्डे दिसू लागल्याने महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून केले जाणारे रस्त्याचे डांबरीकरणाचे पितळ उघडे पडू लागले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला प्रारंभ झाला असून शहरात परराज्यांतील भाविक येऊ लागले आहेत. त्यामुळे पाहुण्यांना यजमान शहराच्या प्रशासनाच्या गलथान कारभाराचे ओंगळवाणे चित्र दिसत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात युद्धपातळीवर रस्त्यांची कामे प्रशासनाकडून उरकण्यात आली आहे. महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी तर रस्त्यांचे निर्माण हेच नवनिर्माण असल्याचे भाकीतही शहराच्या एका दौऱ्यावर असताना केले होते; मात्र पालिका प्रशासनाने ज्या ठेकेदारांना रस्त्यांचे काम दिले त्यांच्यामार्फत कशा पध्दतीने व कोणत्या दर्जाचे काम करण्यात आले आणि हे काम तपासणाऱ्या यंत्रणेने कशा पध्दतीने ‘गुणवत्ता’ तपासली यासारखे प्रश्न रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककरांकडून उपस्थित केले जात आहे.
शहरातील शालिमार, द्वारका, सीबीएस, वडाळानाका, जुने नाशिक, सारडा सर्कल, दिंडोरीरोड, म्हसरूळ, तारवालानगर, काट्या मारुती चौक, निमाणी चौक, रविवार कारंजा या मध्यवर्ती परिसरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडल्याचे चित्र मंगळवारी पहावयास मिळाले. द्वारका चौकातून आडगावच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावर चढतानाच मोठ्या प्रमाणात पाण्याचे तळे साचलेले होते. त्यामुळे वाहनांना सरळ उड्डाणपुलावर न चढता महामार्गावर येऊन पुन्हा डाव्या बाजूला वळण घेत उड्डाणपुलावर जावे लागत होते. (प्रतिनिधी)