घाट झाले गलिच्छ; पाणीही हिरवेगार
By Admin | Updated: October 28, 2015 21:36 IST2015-10-28T21:35:06+5:302015-10-28T21:36:27+5:30
प्रदूषणाचे ग्रहण : पालथ्या घड्यावर पाणी

घाट झाले गलिच्छ; पाणीही हिरवेगार
नाशिक : गोदावरीचे प्रदूषण रोखण्याबाबत कितीही उपाययोजनांबाबत चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात मात्र नदीपात्र प्रदूषित होऊ नये यासाठीच्या उपाययोजना होताना दिसत नाही. पाणी नसल्याने नदीपात्रातून दुर्गंधी येते, असे मान्य केले तरी पात्रात सोडलेले सांडपाणी, टाकण्यात येणारे निर्माल्य यावर अद्यापही आळा बसलेला नाही. यशवंत महाराज पटांगणापासून ते थेट दसक घाटापर्यंतच्या नव्याने बांधण्यात आलेल्या घाटांची दुरवस्था पाहता प्रशासनाला पात्राचे सौंदर्य अबाधित ठेवण्याला अपयश आले आहे, असेच म्हणावे लागेल. नदीपात्रात निर्माल्य टाकण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने नाशिककर गोदापात्र अस्वच्छ करीत आहे. पुलावर अनेक ठिकाणी नदीपात्रात निर्माल्य न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावण्यात आलेले आहे. काही ठिकाणी तर निर्माल्य कलशदेखील ठेवण्यात आले आहेत. परंतु नागरिक कलशातही निर्माल्य टाकत नसून नदीच्या कडेला किंवा नदीपात्रात निर्माल्य टाकत असल्याचे रोजचेच चित्र आहे.
त्याचप्रमाणे नदीपात्रात अनेक ठिकाणी ड्रेनेज सोडण्यात आल्यामुळे दुर्गंधीत अधिकच भर पडत आहे. वास्तविक या प्रकाराला आळा घालणे अपेक्षित असताना पालिकेच्या कृपेनेच ड्रेनेज पात्रात सोडण्यात आल्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. नदीपात्र आणि नव्याने तयार करण्यात आलेला गोदाघाट सुस्थितीत ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर संबंधित गावकरी, मित्रमंडळ तसेच सामाजिक संस्थेकडे जबाबदारी सोपविणे शक्य झाल्यास अशा प्रकारावर आळा बसविणे शक्य होईल का याचा विचार पालिकेने करावा, असा एक सूर निसर्गप्रेमी नागरिकांमध्ये उमटत आहे.