शहर विकासाला मिळणार दिशा

By Admin | Updated: January 10, 2017 01:33 IST2017-01-10T01:33:43+5:302017-01-10T01:33:58+5:30

विकास आराखडा मंजूर : बांधकाम क्षेत्रात चैतन्य, व्यावसायिकांकडून स्वागत

Direction to get city development | शहर विकासाला मिळणार दिशा

शहर विकासाला मिळणार दिशा

 नाशिक : गेल्या दीड-दोन वर्षांपासून रखडलेल्या शहर विकास आराखड्याची अधिसूचना अखेर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने जारी केल्यानंतर या विकास आराखड्याचे बांधकाम व्यावसायिकांनी स्वागत केले असून, त्यामुळे शहर विकासाला दिशा लाभतानाच प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सन २०१३ मध्ये शहर विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु विकास आराखड्याचे प्रारूप जाहीर होण्यापूर्वीच तो फुटल्याने महापालिका महासभेने तो फेटाळून लावला, तर राज्य शासनानेही रद्दबातल ठरवत नवीन विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रकाश भुक्ते यांच्याकडे सोपविली होती. भुक्ते यांनी प्रारूप विकास आराखडा मुदतीत तयार करत तो २३ मे २०१५ रोजी जाहीर केला आणि त्यावर हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यावेळी २१४९ हरकती प्राप्त झाल्या होत्या. हरकतींवर सुनावणी होऊन समितीने अंतिम मंजुरीसाठी आराखडा शासनाकडे पाठविला. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून विकास आराखड्याची प्रतीक्षा लागून होती. त्यातच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेत आराखडा अडकणार अशी भीती व्यक्त होत असतानाच सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने त्याला हिरवा कंदील दाखविल्याने अधिसूचना प्रसिद्ध झाली. सुधारित विकास आराखड्यात प्रकाश भुक्ते यांनी सुचविलेल्या अनेक आरक्षणे व बदलांना मान्यता देण्यात आली असून, रहिवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन - तीन वर्षांपासून मरगळलेल्या बांधकाम क्षेत्राला बूस्ट मिळणार आहे. सुधारित विकास आराखड्यामुळे शहर विकासाला दिशा लाभणार असून, अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील बांधकाम क्षेत्रात त्यामुळे चैतन्य पसरले आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनीही या आराखड्याचे स्वागत केले आहे. विकासाची दिशा सुस्पष्ट झाल्याने रखडलेल्या अनेक प्रकल्पांनाही चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Direction to get city development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.