थेट मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 23:11 IST2016-01-18T23:09:59+5:302016-01-18T23:11:15+5:30
भाजपा सिडको मंडल अध्यक्षपदाचा वाद

थेट मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे
सिडको : भारतीय जनता पार्टीच्या सिडको मंगल अध्यक्षपदाचा वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. आमदार सीमा हिरे यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करीत मुख्यमंत्र्यांच्या कानावर सदर प्रकार घातल्याने याप्रकरणी आता काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे स्वत:च प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने रविवारी सिडको मंडल संदर्भात होणारा निर्णय लांबणीवर पडला आहे.
सिडको मंडल अध्यक्षपद निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंडल अध्यक्ष म्हणून गिरीष भदाणे यांचे नाव जाहीर करताच दुसऱ्या गटाकडून त्यास विरोध करण्यात आला होता. यामुळे वाद निर्माण झाल्याने याबाबत १७ जानेवारी रोजी निर्णय देण्याचे भाजपा प्रदेश अध्यक्षांकडून सांगण्यात आले होते, परंतु प्रदेशाध्यक्षच स्वत:च्या निवडणुकीत व्यस्त असल्याने सिडको मंडल अध्यक्षपदाचा तिढा अद्यापही कायम आहे.
भारतीय जनता पार्टीच्या सिडको मंडल अध्यक्षपदाची निवडणूक गेल्या १० जानेवारी रोजी पार पडली. या निवडणुकीत एका गटाकडून गिरीश भदाणे, तर दुसऱ्या गटाकडून नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांचे समर्थक असलेले बाळासाहेब पाटील तसेच अॅड. प्रकाश अमृतकर, यशवंत नेरकर आदि इच्छुक होते. निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी मोरुस्कर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच गिरीश भदाणे यांची सिडको मंडल अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. यानंतर काही वेळाने आमदार सीमा हिरे या निवडणूक प्रक्रियेत सामील झाल्या. तोपर्यंत भदाणे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. परंतु भदाणे यांची निवड ही मान्य नसल्याचे कारण सांगत आमदार हिरे समर्थकांनी घोषणाबाजी केली व त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. यानंतर तासाभराने आमदार सीमा हिरे यांनी मंडल अध्यक्ष म्हणून बाळासाहेब पाटील यांचे नाव घोषित केले. यामुळे सिडको मंडल अध्यक्ष म्हणून भदाणे व पाटील अशी दोन नावे आली. सदरचा वाद हा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे गेला. दुसऱ्या दिवशी आमदार सीमा हिरे समर्थकांसह मुंबई येथे भाजपा कार्यालयात जाऊन दानवे यांची भेट घेतली. यावेळी दानवे यांनीही येत्या १७ जानेवारीपर्यंत निर्णय देणार असल्याचे सांगितले, परंतु अद्याप याचा निर्णय झालेला नाही. (वार्ताहर)