दिंडोरीतील पाणीटंचाई दूर
By Admin | Updated: February 6, 2016 22:33 IST2016-02-06T22:29:24+5:302016-02-06T22:33:17+5:30
ओझरखेड : योजनेचे पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित

दिंडोरीतील पाणीटंचाई दूर
दिंडोरी : शहरास वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी ओझरखेड धरणातून थेट पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देत आगामी दोन महिन्यात सदर योजनेचे पाणी दिंडोरीवासीयांना मिळेल, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी दिले.
नगरपंचायतीच्या सभागृहात आमदार झिरवाळ, माजी आमदार चारोस्कर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता ए. बी. पाटील, नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख आदिंसह सर्व नगरसेवक व प्रमुख नेत्यांची संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी अभियंता नंदनवरे यांनी सदर योजना विविध तांत्रिक कारणांनी रखडली होती; परंतु वर्षभरापासून तिचे काम सुरू झाले; मात्र दरम्यान ग्रामपंचायत बरखास्त झाल्याने पुन्हा काम रखडले. त्यावर सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने मार्ग काढत सदर योजना जिल्हा परिषदेने पूर्ण करावी, असा प्रस्ताव शासनाला पाठवत त्यास मंजुरी मिळाली आहे़ सदर योजनेचे काम जिल्हा परिषद पूर्ण करून नगरपंचायतीकडे हस्तांतरित करणार असल्याचे ते म्हणाले, सध्या योजना पूर्ण करण्यासाठी निधीही उपलब्ध असल्याचे नंदनवरे यांनी सांगितले. नंदनवरे यांनी योजनेचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीस नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, विश्वास देशमुख, नगरसेवक कैलास मवाळ, प्रमोद देशमुख, तुषार वाघमारे, संतोष गांगोडे, सुनील भवर, नगरसेवक रचना जाधव, शैला उफाडे, रत्नाबाई बोरस्ते, आशा कराटे, रंजना चारोस्कर, माजी सरपंच दिलीप जाधव, काका देशमुख, सुभाष बोरस्ते, माधवराव साळुंखे, व्ही.जी.देशमुख, संपत बोरस्ते, भास्कर कराटे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)